राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यामध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांना डावललं गेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते असून देखील छगन भुजबळांना का डावललं अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. भुजबळ समर्थकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र छगन भुजबळ यांना का डावललं याचे अनेक अंदाज बांधले जात आहे. यावर एक नजर टाकुया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगेविरोधात आक्रमक भूमिका
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका महायुतीसाठी अडचणीची ठरत होती. एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना भुजबळ सातत्यांने मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत होते. त्यामुळे एकप्रकारे सरकारच्या भूमिकेला भुजबळ आव्हान देताना दिसले होते. या मुद्द्यावरुन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच मराठा समाजाचा रोष ओढावू नये, म्हणून महायुतीने ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये)
नांदगावमधील बंडखोरी
विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र दुसरीकडे समीर भुजबळ यांनी केलेल्या बंडखोरीला त्यांनी छुपं समर्थन देत युती धर्म पाळला नसल्याचं बोललं जात आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती. यावरुन देखील महायुतीतील नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?)
नाशिकमधून कोकाटे-झिरवाळ यांना संधी
छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मात्र नव्या आमदारांना संधी द्यायची असेल तर कुणाला तरी डावललं जाणार होते. भुजबळ यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे ते पक्षात आणि सरकारमध्ये मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. याशिवाय नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्याने भुजबळांना डावलल्याची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world