आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं खडतर नशीब अजुनही त्यांची पाठ सोडत नाहीयेत. यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा द्विशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना RCB ला पराभव पत्करावा लागला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात RCB ला एका धावेने पराभव पत्करावा लागला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना KKR ची जोरदार सुरुवात -
नाणेफेक जिंकत RCB चा कर्णधार फाफ डु-प्लेसिसने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. KKR कडून फिल सॉल्ट आणि सुनील नरीन यांची संघाला चांगली सुरुवात करुन दिली. धोकादायक ठरु पाहणाऱ्या सुनील नरीनवर अंकुश लावण्यात RCB च्या बॉलर्सना यश आलं. परंतु दुसऱ्या बाजूने फिल सॉल्टने सुंदर फटके खेळत KKR ला चांगली धावसंख्या गाठून दिली. पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी झाल्यानंतर मोहम्मद सिराजने सॉल्टला बाद केलं. सॉल्टने 14 बॉलमध्ये 7 फोर आणि 3 सिक्स लगावत 48 धावा केल्या.
या धक्क्यातून KKR चा संघ सावरतो न सावरतो तोच यश दयालने सुनील नरीनला माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेला अंगक्रीश रघुवंशीही फारशी छाप पाडू शकला नाही.
हे ही वाचा - T-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी मी 100 टक्के तयार, पण... : दिनेश कार्तिकचं महत्वाचं विधान
RCB चे गोलंदाज भरकटले, KKR दोनशे पार -
यानंतर RCB चे गोलंदाज पुन्हा भरकटलेले पहायला मिळाले. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि त्याला आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, रिंकू सिंग यांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित षटकांत 6 विकेट गमावत 222 धावांपर्यंत मजल मारली. RCB कडून यश दयाल आणि कॅमरुन ग्रीनने प्रत्येकी २-२ तर मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी १-१ विकेट घेतली.
RCB ची सावध सुरुवात, मात्र विराटच्या विकेटने नवा वाद -
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना RCB ने डावाची सावध सुरुवात केली. विराट आणि फाफ डु-प्लेसिस यांनी काही सुंदर फटके खेळले. परंतु हर्षित राणाच्या गोलंदाजीवर विराट कोहली 18 धावा काढून बाद झाला. हर्षित राणाचा बॉल यावेळी कमरेच्या वर असल्याची तक्रार विराटने केली होती, परंतु तिसऱ्या पंचांनी तो बॉल वैध ठरवला. ज्यामुळे विराट पॅव्हेलियनमध्ये परतताना नाराज दिसत होता.
या धक्क्यातून RCB चा संघ सावरतो न सावरतो तोच फाफ डु-प्लेसिसही माघारी परतला. वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर व्यंकटेश अय्यरने त्याची विकेट घेतली.
हे ही वाचा - 11 वर्षांनंतर एक गोष्ट घडली आणि IPL ला BCCI कडून परवानगी मिळाली
अखेरीस RCB च्या डावाला मिळाला आकार -
विल जॅक्स आणि रजत पाटीदार या दोन फलंदाजांनी अखेरीस RCB चा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी सुंदर फटकेबाजी करत १०२ धावांची भागीदारी केली. या जोडीच्या फटकेबाजीमुळे RCB चा संघ सामन्यात कमबॅक करतोय असं वाटत असतानाच विल जॅक्स माघारी परतला. आंद्रे रसेलने त्याची विकेट घेतली. जॅक्सने 32 बॉलमध्ये 4 फोर आणि 5 सिक्स लगावत 55 धावा केल्या. या धक्क्यातून RCB सावरतो न सावरतो तोच रजत पाटीदारलाही रसेलने माघारी धाडलं. रजत पाटीदारने 23 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्स लगावत ५२ धावा केल्या.
RCB च्या डावाला गळती, परंतु अखेरच्या फळीची झुंज -
यानंतर RCB च्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निराशा केली. कॅमरुन ग्रीन आणि महिपाल लोमरोर हे स्वस्तात माघारी परतले. परंतु सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक आणि कर्ण शर्मा यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्याचं पारडं पुन्हा RCB च्या दिशेने झुकलं. प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर कर्ण शर्माने लॉकी फर्ग्युसनच्या साथीने पुन्हा एकदा RCB ला आशा दाखवत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु अखेरच्या षटकातील पाचव्या बॉलवर तो बाद झाला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावा हव्या असताना RCB चे गोलंदाज एकच धाव काढू शकले. लॉकी फर्ग्युसनला बाद करत KKR ने एका धावेने निसटता विजय संपादन केला.
KKR कडून आंद्रे रसेलने 3 विकेट घेतल्या. त्याला सुनील नरीन आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2-2 तर मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांनी 1-1 विकेट घेत चांगली साथ दिली.