
28 मे 2017 ची सकाळ...जवळपास 11ची वेळ. मुंबईत राहणारी निधी जेठमलानी त्यावेळी कॉलेजला चालली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत असं काही घडलं की तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं. मात्र आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दुर्मीळ घटना मानून रेल्वेमंत्र्यांना पाच कोटींच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास सांगितलं आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी कॉलेजला जात असताना मरीन ड्राइव्हवर रस्ता पार करीत असताना निधीचा अपघात झाला होता. हा छोटा अपघात नव्हता. यामुळे निधीचं आयुष्यच बदलून गेलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रस्ते अपघातानंतर निधी कोमात गेली...
या रस्ते अपघातात निधीच्या डोक्यावर जबर मार लागला होता. हा आघात इतका मोठा होता की, अपघातानंतर ती कोमामध्ये गेली होती. निधी तरुण होती, तिची बरीच स्वप्नं होती... मात्र सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. या एका अपघाताने तिच्याकडून तिची स्वप्न हिरावून घेतली. ज्या गाडीने निधीला धडक दिली ती कार पश्चिम रेल्वेची होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने केंद्रीय रेल मंत्र्यांनाकडे दुर्मीळ प्रकरण मानून सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा - Kolhapur News: कार चालवत असतानाच आला 'हार्टअटॅक', 120 च्या स्पीडने गाडी, पुढे जे घडलं ते...
कोर्ट म्हणालं, दुर्मीळ प्रकरण...
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांनी हे प्रकरण दुर्मीळ मानलं. ते 6 मार्चच्या सुनावणीदरम्यान म्हणाले, अपघाताचा परिणाम इतका भीषण होता की, ती मरता मरता वाचली. या मुलीचे फोटो पाहून कोणाला धक्का बसेल. त्यामुळे निधीच्या आई-वडिलांना किती त्रास होत असेल? पैशांतून निधीच्या वेदना आणि तिच्या कुटुंबावरील आघात कमी करू शकणार नाही. मात्र तरीही कुटुंबाकडून बेडवर कोमात असलेल्या निधीवरील उपचासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे या प्रकरणात रेल्वेने सहानुभूती दाखवावी आणि नुकसानभरपाईची रक्कम पाच कोटींपर्यंत करण्याची मागणी केली आहेत.
मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या 2021 च्या आदेशाविरुद्ध अपीलावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे निधीला व्याजासह सुमारे 70 लाख रुपये आणि 1.5 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली होती. मात्र ही रक्कम कमी असल्याचं सांगत पीडितेच्या कुटुंबाकडून नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या या संबंधित अपीलावर सुनावणी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world