Agra Crime News: विश्वास आणि क्रूरतेचा असा खेळ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. जो तरुण एका बेपत्ता मुलीच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होता, जो रात्रभर कुटुंबासोबत गल्लीगल्लीत तिला शोधण्यासाठी वणवण फिरत होता, त्याच तरुणाच्या हाताला तिच्या रक्ताचा वास येत होता. समोर रडणारे कुटुंब आणि बाजूला उभा असलेला त्यांचा रक्षकच प्रत्यक्षात भक्षक निघाला. ही एखाद्या थरारपटाची कथा वाटू शकते, पण ताजनगरी आग्रा येथून समोर आलेलं हे वास्तव काळजाचा थरकाप उडवणारे आहे.
कुटुंबासोबत शोध घेण्याचं नाटक करणाऱ्या या नराधमाने एका तरुणीचे तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांना जेव्हा या प्रकरणाचा सुगावा लागला, तेव्हा त्यांनाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
काय आहे प्रकरण?
मिंकी शर्मा नावाची तरुणी एका कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती. 24 जानेवारी रोजी सकाळी ती कामावर जाते म्हणून घराबाहेर पडली, पण पुन्हा कधीच परतली नाही. तिची रात्रभर वाट पाहिल्यानंतर घाबरलेल्या भावाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. विशेष म्हणजे, ज्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जात होती आणि ज्यावेळी मिंकीचा शोध घेतला जात होता, तेव्हा विनय सिंह नावाचा तरुण सावलीसारखा कुटुंबासोबत होता. विनय हा मिंकीच्याच ऑफिसमध्ये काम करत होता आणि तिचा मित्र असल्याचे भासवत होता.
( नक्की वाचा : Crime News : 100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्या उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी )
यमुना नदीच्या पुलावर सापडलेली रक्ताळलेली गोणी
मिंकी बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतरच रामबाग येथील यमुना नदीच्या पुलावर पोलिसांना एक बेवारस गोणी आढळली. ती गोणी उघडताच उपस्थित पोलिसांचीही वाचा बसली. त्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह होता, मात्र त्या मृतदेहाचे शीर गायब होते.
पोलिसांनी तात्काळ मिंकीच्या कुटुंबाला पाचारण केले आणि कपड्यांवरून तिची ओळख पटली. ज्या तरुणीला सर्वजण जिवंत शोधत होते, तिचा असा शेवट झालेला पाहून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.
( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )
कसं झालं प्रकरण उघड?
आग्रा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून 5 पथके तैनात केली. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एका फुटेजमध्ये पोलिसांना विनय सिंह संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता विनयला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांनाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जो खुलासा केला तो ऐकून पोलीसही सुन्न झाले.

विनय आणि मिंकी गेल्या 2 वर्षांपासून सोबत काम करत होते. विनयचे मिंकीच्या घरी येणे-जाणे होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, मिंकी इतर कोणाशी तरी फोनवर बोलते असा संशय त्याला गेल्या काही दिवसांपासून होता. याच संशयाने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने हत्येचा कट रचला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि विनयने चाकूने मिंकीचा गळा चिरून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने डोके धडापासून वेगळे केले होते.
आग्रा सिटीचे डीसीपी अली अब्बास यांनी सांगितले की, आरोपी विनय सिंहच्या जबाबानंतर रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे. विनयने केलेला गुन्हा इतका क्रूर होता की त्याने माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. सध्या न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world