जाहिरात

Ahilyanagar News : पहाटे 5 ची वेळ; माजी सरपंचांची कार धडाधड पेटली, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडतंय?

गेल्या चार महिन्यांत वाहन जाळण्याची ही दुसरी घटना असून दोन्ही प्रकरणांत एकाच आरोपीवर संशय व्यक्त होत असल्याने परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Ahilyanagar News : पहाटे 5 ची वेळ; माजी सरपंचांची कार धडाधड पेटली, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडतंय?

सुनिल दवंगे, प्रतिनिधी  

Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथे सामाजिक कामातून मदत केल्याच्या वादातून माजी सरपंच संदीप भाऊसाहेब शेलार यांच्या चारचाकी वाहनाला पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत वाहन जाळण्याची ही दुसरी घटना असून दोन्ही प्रकरणांत एकाच आरोपीवर संशय व्यक्त होत असल्याने परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद-खैरी निमगाव रोड परिसरात शुक्रवारी १० एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी संदीप शेलार (वय ४९, रा. जाफराबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अनिल दशरथ नांगळ या शेतकऱ्याला कायदेशीर मदत केली होती. याच कारणावरून आरोपी शुभम बाबासाहेब नांगळ (वय २५, रा. नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) याने सूडाच्या भावनेतून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अहिल्यानगरमध्ये भीतीचं वातावरण...

या घटनेत फिर्यादींच्या ताब्यातील एमएच ४८ ए ५४२७ क्रमांकाची सिल्वर रंगाची XUV-500 कार पेट्रोल टाकून जाळण्यात आली. अंदाजे तीन लाख रुपये किमतीच्या या वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जाफराबाद गावात यापूर्वीही अशाच प्रकारे वाहन पेटवण्याची घटना घडली होती. दोन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार पी. डी. आगलावे करत आहेत. या प्रकरणी आरोपी शुभम नांगळ याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने विविध ठिकाणी तपास मोहीम हाती घेतली आहे. या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, गावातील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. स्थानिकांनी पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com