
योगेश शिरसाट प्रतिनिधी,
Akola Conversion Case : अकोलामध्ये जबरदस्तीनं धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार उघड आला आहे. पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गावात प्रार्थना सभेच्या नावाखाली हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून, आरोपींनी एका दिव्यांग शेतमजुराला आर्थिक आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आणि गावात तणावपूर्ण शांतता आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील फिर्यादी देवानंद नारायण चवरे (वय 43) हे एका पायाने अधू असून त्यांना दम्याचाही त्रास आहे. 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सोनाजी नथ्थु शिंदे याने त्यांना थांबवून प्रार्थनेसाठी बोलावले. यावेळी, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास त्यांचा दमा आणि पाय बरा होईल, तसेच त्यांना 50,000 ते 1,00,000 रुपये मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. मात्र, त्यांनी नकार दिल्यास आजार बरा होणार नाही, अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप चवरे यांनी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चवरे यांनी गावातील महिला सरपंचाचे पती साईनाथ देवकर यांना दिली. त्यानंतर सतर्क गावकऱ्यांनी सोनाजी शिंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली. तिथे 35 ते 40 अनोळखी पुरुष आणि महिला मेणबत्त्या लावून प्रार्थना करत असताना आढळून आले. यामुळे गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
पोलिसांची कारवाई आणि गुन्हा दाखल
गावकऱ्यांच्या माहितीनंतर चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रार्थना करणाऱ्या सर्व व्यक्तींना ताब्यात घेतले. चौकशीनंतर एकूण 34 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 196(1), 299, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
या प्रकरणात सोनाजी नथ्थु शिंदे यांच्यासह एकूण 34 जणांची नावे समोर आली आहेत.
( नक्की वाचा : Shahid Afridi 'शाहिद आफ्रिदीनं मला धर्मांतर करण्यास अनेकदा सांगितलं', माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट )
पोलिसांनी काय सांगितलं?
या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन म्हणाले, "एकूण 34 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रतिबंधक कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस विभाग सतर्क आहे. कोणत्याही संशयास्पद धार्मिक प्रलोभन अथवा जबरदस्ती जाणविल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी."
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे धर्मांतराचा हा संभाव्य कट उधळला गेला असून, सध्या गावात शांतता आहे. चान्नी पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world