योगेश शिरसाट
ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थेकडून ठेवी परत न मिळाल्याने तब्बल 16 पेक्षा अधिक ठेवीदारांनी जुन्या शहर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. या तक्रारींमध्ये ठेवीदारांनी संस्थेने परतावा न देता आर्थिक विश्वासघात केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शहरात मोठे आर्थिक घोटाळ्याचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तक्रारदार विलास महादेवराव हनुमते यांनी केलेल्या विस्तृत तक्रारीत संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तुषार मनोहर हुने, उपाध्यक्ष निलेश गावंडे, तसेच सदस्य प्रकाश जोशी आणि राजीव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम नियमबाह्य पद्धतीने वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली आहे. संस्थेकडून कोणताही स्पष्ट हिशोब न देणे, ठेवी परत न करणे आणि चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठेवीदारांचा रोष आणखी वाढला आहे. या प्रकरणामुळे संस्थेच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त तक्रारींच्या आधारे जुन्या शहर पोलिसांनी प्राथमिक पडताळणी पूर्ण करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.
पोलिसांचे पथक संबंधित कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि संस्थेच्या आर्थिक हालचालींची तपासणी करत असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान, स्वतःच्या आयुष्यभराची बचत संस्थेत जमा केलेल्या अनेक ठेवीदारांमध्ये मोठी चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा वेगाने उलगडा होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी होत आहे. या ठिकाणी गुंतवणूक करणारे ही अतिशय गरीब आणि सर्व सामन्य लोक आहे. त्यामुळे त्यांची छोटी रक्कम बुडणे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमचे पैसे आम्हाला परत मिळालेत अशी मागणी ते करत आहे. त्यात आता त्यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world