Badlapur Physical Assault Case : बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. एका चौथीतील चिमुरडीवर शाळेतील स्वच्छतागृहात सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेविरोधात स्थानिकांनी निदर्शनं केली. रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. पुढील काही दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले होते. आरोपी आणि शाळेविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी आणि त्या शाळेच्या व्यवस्थापनातील सदस्य (सचिव) तुषार आपटे यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ज्या शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला त्या शाळेतील व्यवस्थापकांमध्ये तुषार आपटेचं नाव आहे. चौथीच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या पालकांकडून केला होता. याशिवाय शाळेच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात तुषार आपटे सहआरोपी होता. त्यांच्यासह शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर दोघेही फरार होते. शेवटी ३५ दिवसांनी कर्जत येथील एका फार्महाऊसमधून ठाणे गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. अद्यापही त्याच्याविरोधात कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक...
बदलापूर येथील बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेतील आरोपी तुषार आपटे यांना कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवकपद दिलं आहे. भाजपाने तुषार आपटे यांना बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक बनवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत तर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तुषार आपटे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहेत. आपटे यांनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्याने त्यांना संधी दिल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक बनवल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world