जाहिरात

Beed News : गावातील मुलीच्या 'त्या' कृत्याने तरुणाचा आत्मसन्मान दुखावला; वडिलांना फोन करून संपवलं जीवन

बीडच्या परळी तालुक्यातील मोहा परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

Beed News : गावातील मुलीच्या 'त्या' कृत्याने तरुणाचा आत्मसन्मान दुखावला; वडिलांना फोन करून संपवलं जीवन

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : बीडच्या परळी तालुक्यातील मोहा परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान एका तरुणाच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रहार राजेभाऊ शिंदे या तरुणाने मानसिक तणाव आणि अपमान सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास मोहा येथील करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात गावातीलच एका तरुणीने चंद्रहारला सर्वांसमक्ष थोबाडीत मारले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे चंद्रहार प्रचंड खचला होता. जवळच्या लोकांनीही तो घटनेनंतर अस्वस्थ आणि शांत झाल्याचे सांगितले.


वडिलांना केला शेवटचा फोन

या अपमानाचा मानसिक ताण त्याला सहन झाला नाही. आत्महत्येपूर्वी चंद्रहारने आपल्या वडिलांना फोन करून, “हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही,” असे भावनिक शब्द उच्चारले. त्यानंतर त्याने फोन बंद केला. मुलाचा संपर्क तुटल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे एका लिंबाच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत चंद्रहार आढळून आला. ही घटना पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा - Pune News : चिंता वाढली, परिसरात नाकेबंदी; पुण्यातील गर्ल्स हॉस्टेलबाहेरील 'त्या' बंद बॉक्सचं गूढ अखेर उलगडलं

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू


या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, एका सार्वजनिक अपमानाने तरुणाचा जीव गमवावा लागल्याने समाजातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलीने थोबाडीत का मारली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com