आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय. या निर्घृण हल्ल्यात कार्यकर्त्याचा एक पाय चक्क तोडण्यात आला असून हातही फ्रॅक्चर झाला आहे.
विशेष म्हणजे, या हल्ल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांनीच कायदा हातात घेतल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
काय आहे प्रकरण?
बीडमधील भाटसांगवी आणि औरंगपूर या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कोणताही ठोस विकास झाला नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. याच मुद्द्यावर गावातील आरटीआय कार्यकर्ते बलभीम बोरवडे यांनी आवाज उठवला होता. गावात मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी येऊनही तो खर्च कुठे झाला, याचे उत्तर मिळवण्यासाठी बोरवडे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. मात्र, भ्रष्टाचाराचा हा पोलखोल होण्याची भीती वाटू लागल्याने समोरच्या गटाने टोकाचे पाऊल उचलले.
( नक्की वाचा : Malegaon News : मालेगाव पालिकेत नगरसेवकांचा 'राडा'! एमआयएम आणि इस्लाम पक्ष आमनेसामने, सभागृहात हाणामारी )
8 ते 10 जणांचा सशस्त्र हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, माहिती मागवल्याच्या रागातून शिंदे गटाशी संबंधित श्यामराव पडूळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 8 ते 10 जणांनी बलभीम बोरवडे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या टोळक्याने बोरवडे यांना इतकी अमानुष मारहाण केली की, त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला असून एक हात फ्रॅक्चर झाला आहे.
आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या विजय या मुलालाही या नराधमांनी सोडले नाही. त्यालाही निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. सध्या या पिता-पुत्रावर बीड येथील एका खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: शिंदेंची कोंडी, ठाकरेंची फाटाफूट! संभाजीनगर ZP मध्ये भाजपाने असा फिरवला सत्तेचा गेम )
शिवसेना नेत्यावर गुन्हा, पण अटक शून्य
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्यामराव पडूळे यांच्यासह इतर 8 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र, घटनेला काही तास उलटूनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असल्यानेच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गावगुंडांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना बीडसाठी नवीन नाहीत, मात्र आता थेट सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीच अशा प्रकारे हिंसाचारावर उतरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याला अशा प्रकारे संपवण्याचा प्रयत्न करणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आता पोलीस प्रशासनावर आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे मोठे दडपण असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world