Kalyan News: कल्याणमधील हाय प्रोफाईल व्हर्टेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला दीड वर्ष उलटले आहेत. त्यानंतर आता पुन्हा या आगीत गायब झालेल्या दागिन्यांचा आणि रोकडचा सस्पेन्स चर्चेत आला आहे. एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरातील तिजोरी तोडून त्यातील मोठी रक्कम आणि दागिने लंपास झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नगरसेविका हर्षदा भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत केला आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नसल्याने, भर आगीत डल्ला मारणारा तो 'अदृश्य' चोर नेमका कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
हाय प्रोफाईल इमारतीतील गुढ चोरी
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात व्हर्टेक्स ही शहरातील अत्यंत प्रतिष्ठित आणि उंच इमारत मानली जाते. या इमारतीत मोठे डॉक्टर, व्यावसायिक आणि अधिकारी वास्तव्यास आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी या इमारतीला भीषण आग लागली होती, ज्यामध्ये वरचे 3 मजले जळून खाक झाले होते.
महापालिकेकडे उंचावर आग विझविण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने ही आग विझवण्यासाठी तब्बल 2 दिवस लागले होते. याच इमारतीत डॉक्टर सुमित श्रीवास्तव यांचे निवासस्थान होते. आग विझवल्यानंतर त्यांच्या घरातील तिजोरी इमारतीच्या टेरेसवर सुरक्षित ठेवण्यात आली होती, मात्र जेव्हा डॉक्टर तिथे पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये सरकारी जमिनीवर बारचा 'पुनर्जन्म'; तीन वेळा तोडला तरी पुन्हा उभा राहिलाच कसा? )
तिजोरी तोडली आणि ऐवज लंपास
डॉक्टर श्रीवास्तव यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता, त्यांची तिजोरी तोडलेल्या अवस्थेत होती. त्यातील मोठी रोकड आणि सोन्याचे मौल्यवान दागिने गायब झाले होते. आगीच्या तांडवापेक्षाही या चोरीच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तातडीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, दीड वर्ष उलटूनही हे दागिने आणि रोकड नेमकी कोणी चोरली, याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही.
महासभेत नगरसेविका हर्षदा भोईर यांचा सवाल
केडीएमसीच्या महासभेत हा प्रलंबित विषय भाजप नगरसेविका हर्षदा भोईर यांनी उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ज्यावेळी ही घटना घडली आणि तिजोरी टेरेसवर ठेवली होती, तेव्हा तिथे केवळ अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते, असे हर्षदा भोईर यांनी निदर्शनास आणून दिले.
भोईर यांनी थेट कोणावरही चोरीचा आरोप केला नसला, तरी तो ऐवज गेला कुठे हा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला. यावर काही नगरसेवकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर संशय घेणे चुकीचे असल्याचे म्हटले, मात्र ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश नव्हता, तिथून लाखो रुपयांचा मुद्देमाल गायब होणे हे एक मोठे गूढ बनले आहे.
( नक्की वाचा : Akola News: मामाच्या गावी गेलेल्या सचिनचा शेतात सापडला विद्रूप मृतदेह; अंगावरील खुणांमुळे संशयाचे काहूर )
पोलीस आणि प्रशासनाकडे उत्तर नाही
भर आगीत आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही चोरी झाली कशी, याचे उत्तर ना पोलिसांकडे आहे ना अग्निशमन दलाकडे. या घटनेमुळे हाय प्रोफाईल इमारतींच्या सुरक्षेचा आणि आणीबाणीच्या काळात मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉक्टर श्रीवास्तव यांना आजही त्यांच्या हक्काचे दागिने आणि कष्टाची कमाई परत मिळेल, अशी आशा आहे. मात्र, यंत्रणांच्या ढिसाळ तपासामुळे हा चोरीचा तपास अंधारातच अडकून पडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world