
आंध्रप्रदेश: आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. वधूच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हर्षिता असं आत्महत्या केलेल्या नववधुचे नाव आहे. या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशच्या सत्य साई जिल्ह्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. सोमंडेपल्ली मणिकंठ कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली. हर्षिता ही एकुलती एक मुलगी होती. ४ ऑगस्ट रोजी तिचे लग्न कर्नाटकातील बागेपल्ली येथील नागेंद्रशी झाले होते. यासाठी एक भव्य समारंभही आयोजित करण्यात आला होता. या दोघांच्या लग्नात कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होते. पण लग्नानंतर जे घडलं त्याने लग्नघरात शोककळा पसरली.
सकाळी लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यानंतर लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. सोमंडेपल्ली येथील तिच्या सासरच्या घरी वधूचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. येथेही वराच्या बाजूने सर्व विधी पूर्ण झाले. त्यानंतर नववधु- वराच्या मधुचंद्राची तयारी सुरु झाली. सुहागरातच्या आधी नवरदेव नागेंद्र मिठाई खरेदी करण्यासाठी बाहेर गेला होता. खोलीत हर्षिता एकटीच होती. लग्नाचे घर असल्याने लोक त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे वधू काय करत आहे याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
बराच वेळ वधू बाहेर आली नाही तेव्हा कुटुंबातील सदस्यांना शंका आली ते वधूला बोलावण्यासाठी तिच्या खोलीत गेले. खूप हाका मारूनही वधूने दार उघडले नाही. त्यानंतर दार तोडण्यात आले. आतले दृश्य पाहून सर्वजण ओरडले. प्रत्यक्षात वधू पंख्याला लटकत होती. हे पाहून कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबातील सदस्यांनी तिला खाली उतरवले आणि घाईघाईने तिला सरकारी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी वधूला मृत घोषित केले. सध्या पोलीस नवविवाहित हर्षिताच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत. हर्षिताच्या या पावलामुळे कुटुंबाला धक्का बसला आहे, ते खूप रडत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world