
सुनिल दवंगे
निळवंडे धरणाचे पाणी कोऱ्हाळे गावात येण्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी संपली. गावात पाणी आल्यानं आख्खा गाव आनंदात होता. मात्र बुधवारी दुपारी अवघ्या काही क्षणांत ही आनंदाची लाट शोकसागरात बुडाली. याचं कारण ही तसंच आहे. बंधाऱ्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्यात दोन चिमुकल्या जीवांनी आपला प्राण गमावला आहे. हे दोघे ही सख्खे भाऊ बहीण आहेत. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावातील भांबारेमळा येथे घडली आहे. साहिल प्रशांत डोषी वय वर्ष 12 आणि त्याची मोठी बहीण दिव्या प्रशांत डोषी वय वर्ष 15 हे दोघे भावंडं बंधाऱ्यात आलेल्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा जोर आणि खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना वाचवता आलं नाही. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर गावात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. संपूर्ण गाववर शोककळा पसरली. एकीकडे निळवंडेचं पाणी गावात आलं म्हणून आनंद होता. पण त्याच पाण्यानं दोन चिमुरड्यांचे प्राण हिरावून नेले. ही बाब प्रत्येक गावकऱ्याच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. शिवाय एकच घरातील दोघांना यात जीव गमवावा लागला.
राहाता पोलीस , शिर्डी नगरपरिषद आणि शिर्डी साई बाबा संस्थानच्या अग्निशमन विभागाने मृतदेह बाहेर काढले. तसेच शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी डोषी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. सध्या उन्हाचा जोर आहे. त्यामुळे गरमीने सर्वच हैराण झाले आहे. त्यातून थोडा गारवा मिळेल या उद्देशाने हे भाऊ बहीण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले होते. पण तिथेच घात झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world