संजय तिवारी, प्रतिनिधी
एका 54 वर्षीय महिलेच्या मृत्यू मागे आधी कुटुंबीयांकडून हार्ट अटॅक (Crime News) कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेच्या हत्या प्रकरणात तिची सून आणि तिच्या दोन चुलतभावांना अटक करण्यात आली आहे. सासू सुनेचे नाते कितीही कटू किंवा गोड असले तरी त्याला काळीमा फासणारी ही घटना नागपुरात घडल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा - Beed News : जेवणाचं बिल घेऊन आलेल्या वेटरला बेदम मारहाण, गाडीला लटकवून फरफटत नेलं; घटना CCTV मध्ये कैद
स्मिता ओंकार राऊत वय 54 वर्ष यांचा 28 ऑगस्ट रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असं त्यांची सून वैशाली राऊत हिने पोलिसांना सांगितले होते. अंत्यविधी केल्यानंतर काही बाबी समोर आल्याने संशय बळावला आणि पोलिसांत तक्रार करण्यात आली. सुनेच्या मोबाइलवरून कॉल करण्यात आलेल्या नंबरचा तपास केला असता एकेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला आणि सुनेनेच चक्क दोन चुलत भावना दोन लाख रुपयांची सुपारी देऊन सासूची हत्या करविल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
का केली हत्या?
सासूचा पती आणि मुलगा हयात नाहीत. घरी सासू सून आणि सुनेची पाच वर्षीय मुलगी राहत होते. सासूचे मोठे बंधू भगवान मेंढे यांना सासूला हार्ट अटॅक आल्याची बतावणी केली होती. अंत्यसंस्कार सुद्धा आटोपले. मात्र सासू सुनेचे वाद होत असत. हे सर्वांना माहीत होते. हत्येच्या दिवशी देखील दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते, असं नंतर मृत महिलेच्या मोठ्या भावाला शेजाऱ्यांकडून कळाले. सुनेने आपले वडील आजारी असल्याचे सांगून शेजारणीच्या फोन वरून दहा हजार रुपये चुलत भावाला ट्रान्स्फर केले होते. मात्र, नंतर तिचे वडील आले आणि ते ठणठणीत बरे असल्याचे दिसल्याने शेजारणीचा संशय बळावला होता. रात्री दोन मामा (सुनेचे चुलत भाऊ) घरी आले होते. हे देखील लहान मुलीकडून समजल्याने मृत महिलेच्या मोठ्या भावाने पोलिसांना भेटून मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार दिली आणि तपास करण्याची विनंती केली. पोलिसांनी सुनेचा मोबाईल रेकॉर्ड तपासला. यानंतर खुलासा झाला.
सासूच्या छातीवर बसली...
सासूचं निधन झालं तर संपत्ती आपली होईल असं सुनेला वाटत होते. 27 सप्टेंबर रोजी रात्री तिने दोन्ही चुलत भावांना मागील दाराने घरात घेतले. ती सासूच्या छातीवर बसली आणि दोन्ही चुलत भावांनी सासूचा गळा आवळला. सासूची तडफड शांत झाल्यावर तिने दोघा भावांना परत पाठवले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world