
सायबर गुन्हेगार इतके धूर्त झाले आहेत की, फोनच्या एका रिंगवर लोकांची आयुष्यभराची कमाई लुटून घेत आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी आणि फसवण्यासाठी 'डिजिटल अरेस्ट' हे एक मोठं शस्त्र बनलं आहे. लखनऊमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 100 वर्षांच्या निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याला 1.29 कोटी रुपयांना लुटलं गेलं आहे. ठगांनी 6 दिवस त्या वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून ठेवलं होतं.
सीबीआय अधिकारी बनून केला फोन
या फसवणुकीचे शिकार झालेले हरदेव सिंग हे मर्चंट नेव्हीमधून निवृत्त आहेत. ते लखनऊमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला सीबीआय अधिकारी सांगत होता. त्याने हरदेव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला. शिवाय तुमच्या विरुद्ध वॉरंट निघालं आहे. तुम्हाला अटक होईल असं सांगून त्यांना घाबरवून टाकलं. शिवाय फोनवरूनच त्यांची उलट तपासणी ही केली गेली. त्यामुळे हरदेव सिंग घाबरून गेले होते.
6 दिवस 'डिजिटल अरेस्ट'
या वृद्धावर दबाव टाकण्यासाठी, दुसऱ्या नंबरवरून दुसऱ्या ठगाने फोन केला. तोही त्याच गोष्टी पुन्हा बोलू लागला. ठग विविध मार्गांनी त्यांना घाबरवू लागले. त्यांच्याकडून बँक डिटेल्स आणि इतर माहिती काढून घेतली. संध्याकाळी जेव्हा वृद्धाचा मुलगा घरी परतला, तेव्हा त्यांनी त्याला सर्व घटना सांगितली. वॉरंट आणि अटकेची गोष्ट ऐकून मुलालाही भीती वाटली. यानंतर, ठगांनी बाप-बेट्या दोघांनाही खूप धमकावलं. 6 दिवस त्या वृद्धाला 'डिजिटल अरेस्ट' करून त्रास दिला.
पीडितच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
घाबरलेल्या त्या वृद्धाने आणि त्यांच्या मुलाने सायबर क्राइम हेल्पलाइन वर फोन केला. संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर, लखनऊच्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात पीडितच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठगांच्या मोबाईल नंबरच्या आधारावर प्रकरणाचा तपास करत आहेत. 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर ठगांची एक नवीन पद्धत आहे. ज्यात ते फोन, व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना घाबरवतात. ते स्वतःला पोलीस, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स अधिकारी सांगतात आणि खोटं प्रकरण असल्याचं सांगून भीती दाखवतात. पीडिताला लगेच 'डिजिटल अरेस्ट'मध्ये घेतल्याचं सांगतात. भीती आणि दबावामुळे अनेक लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि आपले पैसे गमावून बसतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world