
संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News : विभक्त कुटुंब पद्धती वाढत असल्याने वृद्धापकाळात जोडप्याला एकटेपण सहन करावा लागतो. मुलगा नोकरीनिमित्त परदेशात तर मुलगी लग्नानंतर तिच्या सासरी गेल्यावर वृद्ध दाम्पत्याला एकटं आयुष्य काढावं लागत असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला दिसत असतात. सोबत कुणी बोलायला नाही, त्यातही आजारपण असेल तर दाम्पत्यांना एकमेकांची शुश्रुषा करीत दिवस काढावे लागतात. या एकटेपणाला कंटाळून यापूर्वीही अनेक वृद्धांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान नागपुरातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे.
नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केल्याचं समोर आलं आहे. या घटनेत 80 वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
नक्की वाचा - Palghar Shocking Video : मालकिणीचा मुजोरपणा, आंदोलनादरम्यान कामगारांच्या अंगावर घातली गाडी
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर परिसरात काल ही घटना घडली. हरणे दांपत्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने नागपुराच्या बाहेर राहतो. तर मुलगी विवाह झाल्यानंतर सासरी राहते. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते.घरी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. आजी-आजोबांची सुसाइड नोट पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
जीव घेणारा एकटेपणा...
वृद्ध दाम्पत्याचा मुलगा भिलाई येथे नोकरीला आहे. मुलगी सासरी असते. त्यांच्याकडे बघायला कोणी नाही. स्वतःचे घर, खर्च करायला पुरेसा पैसा असला तरी आजारपण आणि एकाकी जीवन त्यांना छळत होते आणि त्यातून त्यांनी असा दुर्दैवी मार्ग काढला. त्यांनी घराला कुलूप लावलं आणि बाहेर अंगणात बसून टॅफगोर नावाचं किटकनाशकचे द्रव्य दोन पेल्यात घेऊन प्यायले. त्यानंतर थोड्याच वेळात ते अंगणात तडपत असल्याचे आणि त्यांच्या तोंडाला फेस आल्याचे शेजाऱ्यांना दिसले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेळीच पोलिसांना कळवले असते तर कदाचित गंगाधर हरणे यांचा जीव वाचला असता असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world