
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि लाखो रुपये कमवा अशी आमिष अनेक वेळा दिली जातात. शिवाय अशा आमिषांना अनेक जण बळीही पडतात. कोणतीही चौकशी न करता विश्वास ठेवून सर्व सामान्य मध्यमवर्गीय जास्त परतावा मिळेल या आशेनं आपली पुंजी त्रयस्त माणसाच्या हवाली करतात. शेवटी त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. अशी एक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. यामध्ये चक्क एका शेतकऱ्याने डोंबिवलीत राहणाऱ्या काही जणांना तब्बल 19 लाखांचा गंडा घातला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महेश वारे हे डोंबिवलीच्या साई गीताई इमारतीत राहातात. ते मुळचे चिपळूणचे राहाणारे आहेत. महेश हे चालक म्हणून काम करतात. महेश यांना त्यांच्याच नात्यातील एकाने फोन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार का? अशी विचारणा केली. शिवाय 20 टक्के परताव्याची हमी ही दिली. त्यानुसार महेश यांनी चिपळूण इथं राहाणाऱ्या सुयश सुर्वे याच्याकडे गुंतवणुकीसाठी दोन लाख रुपये दिले.
पुढे वीस टक्क्या प्रमाणे वारे यांचे एक लाख चाळीस हजार रुपये सुर्वे याने परत केले. ही घटना 2022 सालची होती. त्याच वेळी त्यांना सुर्वे याची आई स्नेहश्री यांनी पुन्हा गुंतवणूक करा असं सांगितलं. वारे कुटुंबाची गुंतवणूक करण्याची इच्छा नव्हती. पण त्यांना शाश्वती देण्यात आली. तुमचे पैसे बुडणार नाहीत. ते परत मिळतील. पैसे गुतवा. सुर्वे कुटुंब ओळखीचं असल्याने वारे यांनी विश्वास ठेवला. शिवाय गुंतवणुकीचा निर्णय ही घेतला. ऐवढेच नाही तर अन्य लोकही गुंतवणूक करण्यासाठी तयार झाले.
त्यानुसार दिपाली वारे यांनी 4 लाख, अनिल रेडकर यांनी 4 लाख, रितीका निसणकर 1 लाख आणि महेश वारे यांनी 10 लाख रुपये गुंतविले. असे सर्वांनी मिळून 19 लाखाची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर मात्र या सर्वांना त्यांचा परतावा काही केल्या मिळाला नाही. वारंवार तगादा लावून सुद्धा हे पैसे मिळाले नाही. अखेर या प्रकरणात डोंबिवली विष्णूनगर पोलिस ठाण्यात सुर्वे कुटुंबियांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातला मुख्य आरोपी हा सुयश सुर्वे आहे. तो मूळचा चिपळूण येथील आंतरावली निवळी कोडवाडी गावचा राहणारा आहे. तो शेतकरी असल्याचे समोर आले आहे. शेती शिवाय तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा व्यवसाय करतो. तो काही दिवसांकरीता डेांबिवलीला आला होता. त्यामुळे हा गुन्हा डोंबिवलीत दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप कोणलाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात अडीच लाख रुपये नागरीकांना परत करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world