
Mumbai Crime : मुंबईतील अमित चोप्रा, 47 वर्षीय इमिटेशन ज्वेलर्स याने वांद्रे वरळी सी-लिंकवरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीचे राहणारे अमित चोप्रा यांनी मंगळवार, मध्यरात्री १ वाजता वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारून आपलं जीवन संपवलं. अमित चोप्राची कार जेव्हा वरळी सी लिंकवर पोहोचली तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागला. साप चावला साप चालवा असं म्हणत तो कारमधून बाहेर पळाला.
चोप्राने टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जुहू येथे त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर चोप्रा कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. अद्याप घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. चोप्राने अंधेरीतून मंगळवारी रात्री ९ वाजता कार बुक केली. वांद्रे अंधेरी सी लिंकजवळ पोहोचताच चोप्रा आरडाओरडा करू लागला. साप चावल्याचं चालकाला सांगू लागला. यानंतर कारचालक घाबरला आणि त्याने शेजारीच कार थांबवली. यानंतर आरडाओरडा करीतच चोप्रा कारबाहेर उतरला आणि क्षणात त्याने वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारली.
नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : रात्रभर गप्पागोष्टी करत पेगवर पेग रिचवले; अचानक गोळीबार, मित्रानेच मित्राला संपवलं
यानंतर कॅब चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. चोप्रांची बॅग आणि फोन त्यांनी कारमध्ये ठेवले होते. बॅगेत काही कागदपत्र आणि ओळखपत्र होतं. याच्या आधारावर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांची संपर्क साधला. त्यांचा फोन तपासासाठी पाठविण्यात आला होता. त्यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. चोप्रा यांच्या पत्नीने सांगितलं, सर्वसाधारणपणे रात्री ते घराबाहेर पडतात आणि काही वेळात पुन्हा येतात. मात्र मंगळवारी ते परतले नाही. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी चोप्रा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या कुटुंबावर कोणतंही कर्ज नव्हतं, चोप्रा नैराश्यात होते का, याबाबतही त्यांच्या कुटुंबीयांना काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world