
सुमीत पवार, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी, 16 सप्टेंबर रोजी राहुल रमेश नवथर याची अज्ञाताने गोळी घालून हत्या केल्याची बाब समोर आली होती. गंगापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. कायगाव शिवारात तीन मित्र दारू पित बसले होते. काही कारणास्तव त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून दोघांनी तिसऱ्यावर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाल्याचा प्रकार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी यातील एकाला काल बुधवारी १७ सप्टेंबरला नेवासा फाटा येथून अटक केली. तर एकजण अद्यापही पसार आहे.
मृत राहुल नवथर सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस आणि योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) या दोन मित्रांसह भिवधानोरा शिवारातील गट क्र. 306 मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. मावस व नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी राहुलच्या डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यावर, तर तिसरी पोटात लागल्याने राहुल जागीच मृत्युमुखी पडला. मृतदेह तसाच सोडून मावस आणि नागे घटनास्थळावरून पसार झाले. मंगळवारी रात्री पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
नक्की वाचा - Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार
पोलिसांनी पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. याप्रकरणी मृत राहुलचा भाऊ महेश नवथर यांनी कानिफनाथ मावस याने राहुलला गोळ्या घातल्याची आणि त्यासाठी योगेश नागे याने त्यास मदत केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आरोपी मावस आणि नागे यांनी राहुलवर का गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

मृत राहुल नवथर
पुण्याकडे पळताना बेड्या
आरोपी योगेश नागे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास नेवासा फाटा येथे बेड्या ठोकल्या. गुन्ह्यातील दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाइल बंद करून ठेवल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world