
प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News : देशभरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर तसेच चांगला परतावा मिळावे यासाठीचे आमीष दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. देशभरात वारंवार अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यामुळे ऑनलाइन गुंतवणूक करताना अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नंदुरबार शहरात राहणारे डॉ. मार्तंड देशपांडे यांच्यासोबत देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. डॉ. देशपांडे यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा मेसेज पाहिला होता. त्यानंतर डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. यानंतर डॉक्टर देशपांडे यांनी तब्बल 25 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली. काही दिवसात समोरील व्यक्तीकडून काही प्रत्युत्तर येत नसल्याचं लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचं देशपांडेंच्या लक्षात आलं. यानंतर डॉक्टर देशपांडे यांनी नंदुरबार सायबर सेल येथे गुन्हा दाखल केला.
नक्की वाचा - Navi Mumbai: 'तंत्रमंत्रानं पैसे डबल' 20 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना 18 तासांमध्ये अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर सेलचे प्रभारी हेमंत पाटील यांनी तपास सुरू केला. त्यांनी फसवणूक करणाऱ्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ती तत्काळ गोठवण्याची कारवाई केली. तोपर्यंत अर्ध्याहून अधिक रक्कम काढण्यात आली होती. फसवणुकदारांच्या खात्यात गेलेल्या रक्कमे पैकी 8 लाख 21 हजार रुपये बँकेने तत्काळ ब्लॉक केले होते. त्यानंतर न्यायालय प्रक्रिया पूर्ण करून नंदुरबार सायबर सेलने डॉक्टर देशपांडे यांना आठ लाख 21 हजार रुपये न्यायालयाच्या परवानगीने परत मिळून दिले आहे. एकंदरीत सायबर सेलच्या सतर्कतेमुळे फिर्यादी यांना गमवलेल्या रक्कमे पैकी काही रक्कम परत मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलीस दलाचे आभार मानले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world