
राहुल कांबळे, प्रतिनिधी
"तंत्रमंत्राच्या विधीने पैसे डबल करून देतो" असे आमिष दाखवत सीबीडी बेलापूर येथील एका व्यक्तीकडून २० लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या दोन आरोपींना सीबीडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या १८ तासांत अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १९ लाखांची रोकड आणि एक महागडी स्कुटी असा एकूण सुमारे २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), १२७(२), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मिरा रोड येथील रहिवासी असून, त्यांना "तंत्रमंत्र विधी करून तुमचे पैसे डबल करू" असे सांगून आरोपींनी सीबीडी बेलापूर येथे एक विशेष पूजा विधी आयोजित केली. पूजेदरम्यान तक्रारदाराकडून २० लाख रुपये रोख रक्कम देव्हाऱ्यात ठेवण्यास सांगितले. याच वेळी तक्रारदारांना विधीमध्ये गुंतवून आरोपींनी पैशांची भरलेली बॅग घेऊन तेथून पसार झाले.
( नक्की वाचा : Navi Mumbai : पत्नी आणि सासूवर काळ्या जादूचे अघोरी प्रयोग, नग्न फोटो केले Viral! वाचा काय आहे भयंकर प्रकार? )
सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदेश रेवले, पोनि (गुन्हे) श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक गुप्त बातम्यांचा वापर करून केवळ १८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.
या प्रकरणात सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग साधू महाराज (वय ३५) आणि जयदीप दिनेश पामेचा (वय २५) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 19 लाख 1 हजार रुपये इतकी रोख रक्कम आणि 1 लाख रुपये किंमतीची सुझुकी बर्जमन स्कुटी (MH-46-CT-0679) जप्त करण्यात आलीय. या एकूण जप्तीची किंमत 20 लाख 1 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत तक्रारदाराचे बहुतेक नुकसान भरुन काढले आहे. या गुन्ह्यात आणखी कुणी सहभागी आहे? याचा तपास सुरु असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world