जाहिरात

'बसमध्ये बसलोय...' तो शेवटचा कॉल ठरला; दिवाळीसाठी घरी निघालेला जितेश जिवंत जळाला...कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Jaisalmer-Jodhpur Bus Accident fire: मंगळवारी राजस्थानच्या जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका एसी स्लीपर बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू झाला

'बसमध्ये बसलोय...' तो शेवटचा कॉल ठरला; दिवाळीसाठी घरी निघालेला जितेश जिवंत जळाला...कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जोधपुर:

जितेश चौहान, रागडच्या पॉवर प्लांटमध्ये काम करत होता. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असल्याने तो घरी निघाला होता. जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या स्लीपर बसमधून तो घरी पत्नी आणि मुलांकडे जायला निघाला होता. मात्र हा प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. 

बसमध्ये बसलोय... ते शेवटचे शब्द

बसमध्ये बसण्यापूर्वी जितेशने आपल्या पत्नीला फोन केला. नेहमीप्रमाणे त्याने घरी फोन केला. दिवाळीच्या तयारीबाबत बोलणं झालं. पत्नीच्या आवाजात पतीच्या भेटीची आस होती. फोनवर त्यांने आपण बसमध्ये बसल्याचं सांगितलं. 

टीव्हीवर बातमी पाहिली अन्...

पत्नीने टीव्हीवर जैसलमेर-जोधपूर मार्गावरील बसमध्ये भीषण आग लागल्याची बातमी पाहिली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती वारंवार जितेशला फोन करीत होती. मात्र समोर फक्त रिंग वाजत होती आणि दुसरीकडे पत्नीच्या मनात नको नको ते विचार येत होते. 

नक्की वाचा - Rajasthan Bus Accident: किंचाळ्या, पळापळ... 5 दिवसांपूर्वी खरेदी केलेली बस जळून खाक, 20 प्रवाशांचा मृत्यू

पोलिसांकडून सूचना मिळताच कुटुंबीय जोधपूर रुग्णालयात पोहोचले. ते जखमींमध्ये जितेशला शोधत होते. मात्र तो त्यात कुठेच दिसला नाही. या अपघातात २० लोक मारले गेलेत आणि मृतदेह पूर्णपणे जळाल्याचं कळताच कुटुंबाला सावरणं कठीण झालं. 

जितेशचा भाऊ गजेश चौहानने सांगितलं की आता डीएनए तपासाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख शक्य आहे. दिवाळीचा आनंद दु:खात बदलला आहे. जितेशची आठवण आता त्या शेवटच्या कॉलमध्ये कैद झाली आहे. 

नेमकं काय घडलं?

मंगळवारी राजस्थानच्या जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका एसी स्लीपर बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले. जखमींवर जोधपूरच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com