Jaish-e-Mohammed Lady Commander Dr Shaheen Divorce Reason: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची 'लेडी कमांडर' म्हणून ओळखली जाणारी डॉ. शाहीन (Dr. Shaheen) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. शाहीनच्या अटकेनंतर तिचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय. शाहीनचा पहिला नवरा हा महाराष्ट्रातला होता. जाफर हयात (Zafar Hayat) असं त्याचं नाव असून त्यानं शाहीनबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शाहीनसोबत घटस्फोट का झाला? याचं कारणही त्यानं सांगितलं आहे.
का झाला घटस्फोट?
जाफरनं सांगितलं की, शाहीन आणि त्याचं अरेंज्ड मॅरेज' (Arranged Marriage) झालं होतं. आज देशभरात कट्टर दहशतवादी म्हणून ओळखली जाणारी शाहीन ही त्यावेळी उदारमतवादी ' (liberal) होती, असा नवा दावा जाफरनं केलाय. ऑस्ट्रेलिया किंवा युरोपात स्थायिक होण्याचा शाहीनचा आग्रह होता, त्यामुळे आमचा घटस्फोट झाला असं शाहीननं सांगितलं. आमचा 2012 साली घटस्फोट झाला. त्यानंतर ती कुठं आहे हे मला कधीच माहिती नव्हतं. आम्ही कधीही तिच्या संपर्कात राहिलं नाही. आम्हाला दोन मुलं आहेत, ती माझ्यासोबत राहतात, असं जाफरनं सांगितलं. शाहीननं असं का केलं हे फक्त तीच सांगू शकते, असंही जाफरनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Delhi Blast : सकाळी 3000 किलो स्फोटके आणि संध्याकाळी दिल्लीत स्फोट! काय आहे फरिदाबाद लिंक? )
कोण आहे डॉ. शाहीन?
फरीदाबादमधून अटक झालेल्या डॉ. शाहीन आणि तिचा भाऊ डॉ. परवेझ यांच्याबाबत तपास यंत्रणा मोठे खुलासे करत आहेत. 'जैश'ची महिला विंग कमांडर असलेल्या डॉ. शाहीनला जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेची भारतातील महिला विंग आणि रिक्रूटमेंट (Recruitment) तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
'जमात उल मोमीनात' (Jamat Ul Mominat) ही जैश-ए-मोहम्मदचे महिला विंग आहे. त्याचं भारतामधील नेतृत्त्व शाहीन करत होती. मसूद अझहरची (Masood Azhar) बहीण सादिया अझहर (Sadia Azhar) ही पाकिस्तानात जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे. सादिया अझहरचा पती युसूफ अझहर (Yusuf Azhar) हा कंदाहार हायजॅकचा (Kandhar Hijack) मास्टरमाईंड होता.
शिक्षण, करिअर आणि अचानक 'गायब'
शाहीननं सुमारे 25 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ती कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये (Ganesh Shankar Vidyarthi Medical College) असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) म्हणून रुजू झाली होती. पण, 2013 साली तिनं कुणालाही न सांगता अचानक नोकरी सोडली.
त्यानंतर शाहीन फरिदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये (Al-Falah University) काम करु लागली. याच ठिकाणी ती काश्मिरी डॉक्टर मुजम्मिल उर्फ मुसैब (Dr. Mujammil alias Musaib) याच्यासोबत शाहीन काम करत होती. मुजम्मिलला नुकतेच 2900 किलोग्राम अमोनियम नायट्रेटसह (Ammonium Nitrate) अटक करण्यात आले आहे.
शाहीनच्या कुटुंबानं काय सांगितलं?
शाहीन आणि तिच्या भावाच्या अटकेवर कुटुंबाला विश्वास बसत नाहीये. शाहीनचा मोठा भाऊ डॉ. शोएब (Dr. Shoaib) याने सांगितले की, "मी ट्युशन शिकवतो. त्यांनी (शाहीन आणि परवेझने) असं काही केलं असेल यावर माझा विश्वास बसत नाही. लहानपणी ती अभ्यासात खूप चांगली होती. कौटुंबिक कारणामुळे आमचं गेल्या चार वर्षांपासून शाहीनशी आणि तीन वर्षांपासून परवेझशी बोलणं बंद आहे.
तर, शाहीनच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून त्यांची भेट झाली नाही, मात्र एका महिन्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं. शाहीनवरील आरोपांवर विश्वास बसत नसल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world