जाहिरात

Jalgaon News:जळगाव हादरलं! सासू, साडू, मेहुणीकडून जीवघेणा छळ; कंटाळलेल्या तरुणाची आत्महत्या; संतापजनक कारण उघड

Jalgaon News: जळगावच्या एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील तरुण गौरव बडगुजर याची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या. सुसाइड नोटच्या आधारे सासू, साली आणि साडूवर कासोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jalgaon News:जळगाव हादरलं! सासू, साडू, मेहुणीकडून जीवघेणा छळ; कंटाळलेल्या तरुणाची आत्महत्या; संतापजनक कारण उघड
"Jalgaon News: सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या"
प्रतिकात्मक फोटो Canva

- मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News: सासरच्या मंडळींकडून होणारा मानसिक त्रास, पैशांचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील गौरव ज्ञानेश्वर बडगुजर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, मृत्यूपूर्वी गौरवने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

सासरच्या त्रासाला तरुण कंटाळला

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बडगुजर हा तरुण गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक विवंचनेत होता. सासरच्या त्रासामुळे तो कंटाळला होता. सासरच्या मंडळींकडून गौरवकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती, तसेच त्याला धमकावलेही जात होते. या सततच्या मानसिक त्रासामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. अखेर हा त्रास सहन न झाल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

सुसाइड नोटमध्ये नावांचा खुलासा

आत्महत्या करण्यापूर्वी गौरवने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. यामध्ये त्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की,  सासू, साडू आणि मेहुणी यांच्याकडून मिळणाऱ्या मानसिक त्रासामुळेच तो हे पाऊल उचलत आहे. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.

(नक्की वाचा: Viral Video: नागपुरात भरचौकात रक्तरंजित घटना! पती-पत्नीने लोकांसमोरच सपासप वार करून प्रियकराला कायमचं संपवलं)

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी मयत गौरवच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आणि सुसाइड नोटमधील मजकुरावरून कासोदा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता बडगुजर (सासू), भटू गरुड (साडू), गौरी गरुड (साली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलीस प्रशासनाची भूमिका

घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून गौरवच्या आत्महत्येमुळे भातखेडा गावावर शोककळा पसरली आहे. एका तरुण मुलाने अशा प्रकारे सासरच्या जाचाला कंटाळून प्राण गमावल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com