अमजद खान
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असताना नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली. ती त्याच्यात अशी काही गुंतली की तो जे बोलत होतो ते ती करत होती. हे करणं तिला नंतर मात्र महागात पडलं. या तरुणाने आधी मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यातून तो तिला ब्लॅकमेल करु लागले. हजारो रुपये तिच्याकडून उकळेल. हा प्रकार एक दोन नाही तर तब्बल पाच वर्ष सुरू होता. ही बाब मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यानंतर या संपुर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आकाश दाभाडे या तरुणाला संभाजीनगर इथून अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांसोबत मानपाडा पोलीस स्टेशनला आली. तिने सांगितले की तिच्या सोबत गेल्या पाच वर्षापासून एक तरुण घाणेरडा प्रकार करून पैसे उकळत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पथक नेमले गेले. त्या तरुणाला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीसांनी योजना ही आखली. मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस अधिकारी राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
त्या तरुणाने आकाश या इन्स्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनीला संपर्क साधला होता. त्याची ओळख झाल्यानंतर त्याने आपली आई आजारी आहे असं सांगित काही पैसे सुरूवातीला त्या मुलीकडून घेतले होते. तिनेही त्याला पैसे दिले होते. पुढे त्यांची चांगली ओळख झाली. त्यातून त्याने मुलीचे काही अश्लील फोटो काढले. त्या फोटोवरून तो तिला सतत ब्लॅकमेल करू लागला होता. घाबरून तिनेही तो जी पैशाची मागणी करत होता ती पुर्ण केली. शिवाय ही बाब कोणालाही सांगितली नाही.
परत त्याने तिचे तेच फोटो दाखवत पन्नास हजाराची मागणी केली. पोलिसांना ही बाब माहित पडताच पोलिसांनी नवी मुंबई येथे एका ठिकाणी सापळा रचला. त्या तरुणाला नवी मुंबई येथे यायला सांगितले. मात्र तो तरुण आला नाही. पुन्हा पोलिसांनी इंस्टाग्राम आणि तांत्रिक बाबीच्या तपास करत अखेर त्या आरोपीला संभाजीनगर येथून बेड्या ठोकल्या. आकाश दाभाडे असे तरुणाचं नाव आहे. आकाशला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आकाशने या मुलीला इतका मानसिक त्रास दिला होता की ही मुलगी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत होती.
मात्र कुटुंबीयांनी व पोलिसांनी त्या मुलीची समजूत काढली. शिवाय वेळीच आकाशला बेड्या ठोकल्या. सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुली फसत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. त्यामुळे मुल सोशल मीडियाचा वापर नक्की कशासाठी करत आहेत यावर पालकांनी लक्ष ठेवणे ही तेवढेच गरजेचे आहे. जर काही चुकीची गोष्ट त्यांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं पाहीजे असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world