
Kalyan News : कल्याणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी महेश पाटील आणि सुजित नलावडे यांना जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते वंडार पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हत्येच्या सुपारीचा ऑडिओ क्लिप पुरावा पोलिसांना सादर करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी महेश पाटील आणि सुजित नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. महेश पाटील यांनी सांगितले की, वंडार पाटील यांनी त्यांना, त्यांचे मित्र सुजित नलावडे आणि त्यांच्या मुलाला मारण्यासाठी मुज्जमिल बुबेरे नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती.
कुणी दिली माहिती?
महेश पाटील यांनी यावेळी आपल्याला सुपारीची माहिती कशी लागली हे देखील सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार अर्जुन देशमुख नावाच्या एका तरुणाने त्यांना या सुपारीबद्दलची माहिती दिली. अर्जून देशमुख याच्या बहिणीच्या एका प्रकरणात महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला मदत केली होती.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
या मदतीची जाणीव ठेवून अर्जुन देशमुख यांनी त्यांना हत्येच्या सुपारीची माहिती दिली. या संदर्भात पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप देखील पोलिसांना सादर करण्यात आली आहे.
या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात वंडार पाटील आणि मुज्जमिल बुबेरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या दोघांनाही अद्याप अटक केलेली नाही. या दोघांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही? असा प्रश्न महेश पाटील यांनी विचारलाय.
महेश पाटील यांनी याबद्दल संताप व्यक्त करत प्रश्न विचारला आहे की, "हत्येची सुपारी देणारे वंडार पाटील आणि सुपारी घेणारा मुज्जमिल बुबेरे यांना अटक का केली जात नाही?"
वंडार पाटील काय म्हणाले?
दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे नेते वंडार पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वंडार पाटील यांनी या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मला याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी असे कोणतेही कृत्य केलेले नाही.' आपल्यावर खोटे आरोप करुन दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला.

वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या 2007 साली झाली होती.या प्रकरणात महेश पाटील यांच्यासह 13 जण आरोपी होते. या खटल्याची अंतिम सुनावणी गेल्या महिन्यात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली.या निकालात न्यायालयाने 13 आरोपींपैकी 3 जणांना शिक्षा सुनावली, तर महेश पाटील यांच्यासह 10 जणांची निर्दोष मुक्तता केली. मुलाच्या हत्या प्रकरणात वरच्या न्यायालयात अपिल करु नये म्हणून आपल्यावर हा दबाव टाकला जातोय, असा दावा वंडार पाटील यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world