विम्याच्या रकमेसाठी (Conspiracy For Insurance Money) एका दाम्पत्याने असा काही खतरनाक डाव रचला त्याचा विचार करून तुम्ही सुन्न व्हाल. पतीने आपल्याच मृत्यूचे नाटक रचले. वीम्याची रक्कम मिळावी म्हणून त्याने अपघाताचा बनाव केला. विशेष म्हणजे त्याने मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी आपल्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा खून केला. त्यानंतर वीम्याचे पैसे पत्नीला मिळतील असा त्याचा डाव होता. पण या दाम्पत्याची एक चूक केली अन् त्यांचा खेळ खल्लास झाला. या प्रकरणात हे पती पत्नीच नाही तर अन्य लोकही सहभागी होते. त्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेत या संपुर्ण प्रकरणाता पर्दाफाश केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कट
मुनिस्वामी गौडा आणि त्याची पत्नी शिल्पाराणी हे कर्नाटकचे रहीवाशी आहेत. त्यांनी एक भयंकर कट रचला होता. त्यानुसार त्यांनी एका भिकाऱ्याची हत्या केली. विम्याचे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी हा कट रचला. या घटनेचा उलगडा हत्येच्या दहा दिवसांनंतर झाला. भिकाऱ्याची हत्या करण्याचा कट मुनिस्वामी, त्याची पत्नी शिल्पाराणी आणि ट्रक ड्राइवर देवेंद्र नाईक, सुरेश आणि वसंत या सर्वांनी मिळून केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली होती. त्याची जेव्हा चौकशी केली गेली त्यावेळी त्याने भिकाऱ्याला मारल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी मुनिस्वामी याला अटक केली.
मुनिस्वामी ने स्वताच्या हत्येचा कट का रचला?
मुनिस्वामी याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांने स्वत:चे आधी बरेच विमे काढले. त्यातून विम्याचे मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याचा त्याचा विचार होता. त्यानुसार त्याने कट रचला. आपल्या सारखा दिसणार एक माणूस त्याने शोधला. त्यातून त्याने स्वत:च्या मृत्यूचा डाव रचला. त्याच्या सारखा दिसणारा एक भिकारी त्याला मिळाला. त्याच्याकडे त्याने आपले आधार कार्ड, आणि ओळखपत्र दिलं. त्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू दाखवण्यात आला. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही हा मृतदेह मुनिस्वामीचाच आहे अशी ओळख पटवली.
ट्रेंडिंग बातमी - 'पुतळा बनवणारे ठेकेदार, शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले'
शेवटी अपघात घडवून आणला
मुनिस्वामी याने आपल्या सारखा दिसणार व्यक्ती शोधला होता. त्यानंतर त्या व्यक्तीला घेवून तो हायवेवर आला. एके ठिकाणी पंक्चर काढण्याच्या बहाण्याने तो एका ठिकाणी उतरला. त्याच वेळी तिथे असलेल्या त्याचा ड्रायव्हर मित्र देवेंद्र याने त्याच्या अंगावर ट्रक घातला. त्या त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हा मृतदेह आपल्या पतीचाच आहे असं शिल्पाराणी हीने पोलीसांना सांगितले. त्यानंतर तो मृतदेह पत्नीकडे दिला गेला. पुढे त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
शेवटी 'असा' झाला पर्दाफाश
विम्याचे पैसे लवकर मिळावे यासाठी मुनिस्वामी प्रयत्नशील होता. म्हणूनच तो पोलीसात काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकाला भेटायला गेला. त्यालाही या कटात सहभागी करून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यातून पोलीस चौकशी जलदगतीने व्हावी आणि विम्याचे पैसे लवकर मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. जेव्हा मुनिस्वामीला पोलीस नातेवाईकाच्या समोर आला त्यावेळी तो घाबरून गेला. कारण तोही त्याच्या अंत्यसंस्काराला जावून आला होता. त्यानंतर मुनिस्वामीने सर्व घटना त्याला सांगितली. हे ऐकून पोलीस नातेवाईक हादरून गेला. त्याने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. चौकशी दरम्यान अजून एक गोष्ट समोर आली की मुनिस्वामीने या आधी असाच प्रकार करण्याचा डाव रचला होता. पण त्यात त्याला यश आले नव्हते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world