छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्य केले आहेत. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कारणीभूत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. शिवाय घाईगडबडीत हा पुतळा लावू नका असेही सरकारला सांगितले होते. पण निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी पुतळा लावला गेला असेही राऊत म्हणाले. याबाबत राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करत पुतळा बनवणाऱ्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंधच उघड केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकोटवर उभारण्यात आलेला पुतळा हा ज्या ठेकेदाराने बनवला होता तो ठाण्याचा आहे. शिवाय शिल्पकारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतला आहे. या दोघांचेही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संबध आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे यातून किती कमिशन मिळाले आहे हे ही समोर येणे गरजेचे आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र दुखी आहे. महाराष्ट्राच्या ह्रदयात आरपार वेदना होत आहेत. जनतेने महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे होताना पाहीले आहे. हे पाहण्याची वेळ जनतेवर या सरकारमुळे आली. तरीही हे सरकार हसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नाही असे राऊत म्हणाले. किल्ल्यावर हवा होता असे मुख्यमंत्री सांगत आहेत. पण हवा यांच्या डोक्यात गेली आहे असा हल्लाबोल राऊत यांनी यावेळी केला.
आठ महिन्यात हा पुतळा कोसळला. याला सार्वजनिक बांधकाम विभागही तेवढाच जबाबदार आहे. 1933 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. प्रतापगडावर शिवाजी महाराजांचा 1956 साली पंडीत नेहरूंनी पुतळा बसवला. ते पुतळे आजही तसेच आहेत. पण सिंधुदुर्गातला पुतळा आठ महिन्यात कोसळला. बेईमानी करून हा पुतळा घाईगडबडीत बसवण्यात आला. अनेकांनी हा पुतळा घाईगडबडीत बसवू नका असे सांगितले होते. त्यात संभाजी महाराजांनीही तशी विनंती केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे राऊत म्हणाले. उलट समुद्रावर हवा होती म्हणून पुतळा कोसळला असे सांगितले जात आहे. समुद्रात हवाही असणारच असेही राऊत म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
या पुतळ्यात लाखो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली. शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. भ्रष्टाचारात शिवाजी महाराजांना ही या लोकांनी सोडले नाही. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होवू शकले नाहीत ते लाडक्या बहीणींचे काय होणार असा सवाल ही या निमित्ताने राऊत यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world