- अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे 36 वर्षीय प्रशांत प्रकाश गायकवाड याची पत्नीने हत्या केली
- पत्नी अर्चनाने सुरुवातीला अपघात आणि स्वसंरक्षणाचा बनाव रचला पण पोलिसांच्या तपासात खून उघड झाला
- प्रशांत आणि अर्चनाच्या कौटुंबिक वादामुळे अर्चना दीड वर्ष माहेरी राहिली होती, नंतर सासरी परतली होती
त्रिशरण मोहगावकर
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे एका 36 वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून आणि गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत प्रकाश गायकवाड असे मृताचे नाव आहे. त्याचे वय 36 होते. सुरुवातीला अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा प्रताप अहमदपूर पोलिसांनी आपल्या कौशल्याने उघड केला आहे. प्रशांत आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून अर्चना दीड वर्ष माहेरी राहिली होती. पाच महिन्यांपूर्वीच ती पुन्हा सासरी नांदायला आली होती.
बुधवारी 17 डिसेंबरला सायंकाळी अर्चनाने "पती बेशुद्ध पडला आहे" असा बनाव रचून दीर प्रवीण गायकवाड याला घरी बोलावले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला अर्चनाने "पती दारू पिऊन मारहाण करत असताना, मी त्यांना स्वसंरक्षणार्थ ढकलले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला," असा बनाव रचला होता. मात्र प्रशांतच्या शरीरावरील जखमा आणि गळ्यावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला. तसेच शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब साळवे, तानाजी आरदवाड, हणमंत आरदवाड, पद्माकर पांचाळ आणि विशाल सारोळे यांच्या पथकाने संशयित अर्चना हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अर्चनाने, पोलिसांनी तपासाचा कौशल्याने वापर करताच आणि पोलिसी धाक दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. अर्चनाने कबुली दिली की, मागील भांडणाची कुरापत काढून तिने प्रशांत दारूच्या नशेत असताना भांडण काढले.
त्यावेळी तिने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. नंतरदोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. मृताचा भाऊ प्रवीण गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे अहमदपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या खूनाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवाय प्रशांतच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world