जाहिरात

सरपंचाचं अपहरण करुन संपवलं... बीडमधील थरकाप उडवणाऱ्या प्रकरणात दोघांना अटक

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

सरपंचाचं अपहरण करुन संपवलं... बीडमधील थरकाप उडवणाऱ्या प्रकरणात दोघांना अटक
बीड:

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद आज सकाळपासूनच पाहायला मिळाले. अहमदनगर/अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत होती. अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जयराम चाटे आणि महेश केदार अशी या आरोपींची नावं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद?  

नक्की वाचा - सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद? 

केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी सहा पथकं स्थापन केले आहे. या पथकांकडून धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यात आला. अखेर या दोघांना केज तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली. शनिवारी झालेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये शांतता राखावी पुढील 48 तासात आरोपींना अटक करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमकं काय घडलं?
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर समोर आली आहे. संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला आहे.  सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूरहून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला आहे. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. देशमुख यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून मोठा जमाव या ठिकाणी जमला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com