मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Khalapur News : राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. दरम्यान माथेरानजवळून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ११ मे रोजी ही घटना घडली.
ट्रेकदरम्यान नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतून २० वर्षी रितेश कोणका खालापूर येथील इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. त्याच्यासोबत काही मित्रही होते. सोमवारीही उन्हाचा तडाखा जाणवत होते. ट्रेकिंगदरम्यान त्याची प्रकृती बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि चक्कर येऊन तो खाली कोसळला. यानंतर त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता या मित्रांनी मदतीसाठी हेल्पलाइनवर संपर्क केला. यानंतर त्याला चौक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
तुम्ही ही चूक करू नका...
सध्या राज्याच उन्हाचा कहर आहे. अशा काळात गरज असेल तरच घराबाहेर पडा. ट्रेकला जायचं असेल तर सकाळी किंवा सायंकाळची वेळ निवडा. याशिवाय भरपूर पाणी, ताक, पन्ह सारखे पेय पित राहा. डियाड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी सात्विक आहार आणि पाणीयुक्त अन्नाचा आहारात समावेश ठेवा.
झोळीच्या साहाय्याने पायथ्याची आणलं...
ट्रेक दरम्यान रितेश कोणका याला अचानक त्रास जाणवू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला.
या घटनेनंतर त्यापैकी दोन युवकांनी तातडीने इरशाळवाडीच्या पायथ्याशी येऊन ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत युवकाला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खालापूर पोलीस स्टेशनलाही या घटनेची माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, हेल्प फाउंडेशनची टीम देखील मदतीसाठी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत युवकाला पारंपरिक झोळीच्या साहाय्याने खाली आणण्याचे काम सुरू ठेवले. पायथ्याशी आधीच ॲम्बुलन्स आणि अन्य आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. त्यानंतर संबंधित युवकाला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी काही वेळातच त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृत युवक रितेश कोणका (वय २०) हा डोंबिवली पश्चिम, कोपर परिसरातील रहिवासी असून तो एस.आय. कॉलेज, डोंबिवली येथे शिक्षण घेत होता. या संपूर्ण घटनेत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चौक आउट पोस्टचे प्रभारी पीएसआय विशाल पवार यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ट्रेकिंगसाठी येणाऱ्या युवकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत योग्य काळजी घेणे, पुरेसे पाणी आणि आवश्यक वैद्यकीय खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world