राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik News : नवी मुंबईतून मुलं बेपत्ता होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधून दोन मुली आणि एक मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात हे लोण पसरतय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
फूस लावुन मुलींना पळवलं...
नाशिक शहरात अपहरणाच्या तीन स्वतंत्र घटना समोर आल्या असून दोन मुलींसह एका मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पेठ रोडवरील तीन पुतळे परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील एका मुलीला २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात इसमाने कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर येथे घडली. येथेही एका मुलीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप असून बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जेलरोड परिसरात राहणारा एक मुलगा घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तीनही प्रकरणांत पोलिसांकडून तपास सुरू असून अपहरण करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठीचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
