
Ratnagiri News : रत्नागिरीतील कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईनेच आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची काल सायंकाळी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून, मृत बालिकेचं नाव हुरेन आसिफ नाईक आहे. तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील एका तरुणीचा विवाह चिपळूणजवळच्या गावातील तरुणासोबत झाला होता. या दाम्पत्याला आधीच एक चार वर्षांची मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने संबंधित महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते.
नक्की वाचा - NEET मध्ये 99.99%, MBBS साठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या काही तासांपूर्वी विद्यार्थ्याची आत्महत्या
बुधवारी सायंकाळी तिची बहीण कामानिमित्त बाहेर गेली असताना, या महिलेने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबला. त्यामुळे गुदमरून बाळाचा मृत्यू झाला. शेजारचे नातेवाईक घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आईने असं कृत्य का केलं हे अद्याप समोर आलेलं नाही, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world