Nagpur News: नागपूरच्या हिंगणा परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला हटकणे एका बापाच्या जिवावर बेतले आहे. राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) कार्यरत असलेल्या एका जवानाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी मंडल बंधूंना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
हिंगणा परिसरात राहणारे 42 वर्षीय पंकज ठाकूर हे राज्य राखीव पोलीस दलात सेवा बजावत होते. त्यांच्या शेजारीच राहणारा 23 वर्षीय आकाश हरिदास मंडल हा ठाकूर यांच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करायचा आणि तिला मैत्रीसाठी त्रास द्यायचा. पंकज ठाकूर यांनी आकाशला अनेकदा समज दिली होती आणि आपल्या मुलीपासून दूर राहण्यास बजावले होते. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आकाशने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून आपला त्रास सुरूच ठेवला होता.
घटनेच्या रात्री म्हणजेच शुक्रवारी, पंकज ठाकूर यांनी आकाशला पुन्हा एकदा आपल्या घराजवळ घुटमळताना आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी तिथून निघून गेलेला आकाश काही वेळातच त्याचा भाऊ अर्चित आणि इतर साथीदारांसह परतला. त्यांच्या हातात लोखंडी सळई आणि तीक्ष्ण शस्त्रे होती. या टोळक्याने पंकज ठाकूर यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
( नक्की वाचा : Nagpur News: 35 वर्षांच्या व्यक्तीशी होत होता 15 वर्षांच्या मुलीचा विवाह; भर मंडपातून पोलिसांनी कसं वाचवलं? )
जागीच मृत्यू आणि मेहुणा गंभीर जखमी
हल्लेखोरांनी पंकज ठाकूर यांच्या छातीत लोखंडी सळई आरपार खुपसली, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेले त्यांचे 30 वर्षीय मेहुणे आर पी सिंग यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आर पी सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका कर्तव्यदक्ष बापाने आपल्या मुलीच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार अशा प्रकारे रक्ताने माखल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश मंडल आणि त्याचा भाऊ अर्चित मंडल या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हल्ल्यात सामील असलेल्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. भरवस्तीत एका पोलीस जवानाची अशा प्रकारे हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाकूर कुटुंब सध्या प्रचंड मानसिक धक्क्यात असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world