
प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आदिवासी समाजाला मरणानंतर देखील संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रोझवा प्लॉटमध्ये एका व्यक्तीचे निधन झाले होते. परंतु, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यामुळे मृतदेह घेऊन नेण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे, गावकऱ्यांनी तब्बल दोन तास पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिली. मात्र, काही फायदा न झाल्याने अखेर मृतदेहाला दोराच्या साह्याने वाहत्या पाण्यातून नेण्यात आले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाकडे पूल उभारणीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आदिवासींच्या जीवाला काही मोल आहे की नाही?" असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा - Mumbai News : मुंबईत क्रौर्याचा कळस! 3 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्रेनच्या कचरापेटीत सापडला
रोझवा प्लॉटसह परिसरातील अनेक गावांना पूल नसल्यामुळे दैनंदिन जीवनातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलांचे शाळेत जाणे, आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे, शेतीशी संबंधित कामे अशा अनेक बाबींमध्ये पूल नसल्याचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता तरी राज्यकर्त्यांना आदिवासींच्या समस्यांची जाण होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. सरकार आणि प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी आणि या भागात लवकरात लवकर पूल उभारणीचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world