नवी मुंबई पोलिसांनी 27 वर्षांच्या आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे. राजबहादूर यादव असे या आरोपीचे नाव आहे. कलम 376(2)(एन) च्या तरतुदीनुसार यादव विरोधात कारवाई करण्यात आली आहे. 17 वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा यादववर आरोप आहे. या अत्याचारांमुळे ही मुलगी गर्भवती राहिली आहे. पीडिता ही देखील नवी मुंबईचीच रहिवासी आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात सदर गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीडिता ही आरोपीच्या शेजारी राहते. तिच्यावर आरोपीने वारंवार अत्याचार केले. पीडिता ही साडेतीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई ही गेल्या महिन्याभरात महिलांविरोधातील गंभीर अत्याचारांच्या घटनांमुळे चर्चेत आली आहे. इथे महिलांवरील अत्याचार वाढत चालले असून, सामूहीक बलात्कार आणि खुनाच्या घटनांमुळे नवी मुंबईकर चिंतेत सापडले आहेत.
शीळ फाटा अत्याचार आणि हत्या प्रकरण
शीळ फाट्याजवळील (Shilphata Ganesh Ghol Mandir) गणेश घोळ मंदिरात तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केली. भरगर्दीच्या भागात हा धक्कादायक प्रकार घडला होता. घरातील वादाला कंटाळल्यामुळे शांततेसाठी मंदिरात आलेल्या महिलेला चहातून नशेचं औषध देऊन येथील पुजाऱ्यांनीच आळीपाळीने बलात्कार केला. सकाळी जेव्हा महिलेला हे लक्षात आलं, तेव्हा तिने आरडाओरडा सुरू केला. यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी महिलेची निघृणपणे हत्या करीत झाडाझुडपात फेकून दिलं. भाविकाला या महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
तरुणीचा खून, प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल
नवी मुंबईतील सीवूडस परिसरातील डीपीएस शाळेच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. 19 वर्षांच्या या तरुणीचा खून तिच्या प्रियकराने केला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. 8 ऑगस्ट रोजी या तरुणीचा खून करण्यात आला असावा असा संशय आहे.मुलीचा मृतदेह सापडला त्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणीच्या प्रियकराचाही मृतदेह पोलिसांना सापडला . यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नवी मुंबई पोलिसांना गुरुवारी या तरुणीचा मृतदेह सापडला होता. डीपीएस शाळेच्या तलावात मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना खबर दिली. हा मृतदेह नेरूळ येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.या तरुणीचे पनवेल इथे राहणाऱ्या स्वस्तिक पाटील (22वर्षे)सोबत प्रेमसंबंध होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world