मनोज सातवी, पालघर:
Palghar News: मित्राच्या लग्नाहून परतताना तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. आतेश भोईर असं या मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे आतेशचा आज 19 एप्रिल रोजी साखरपुडा आणि 10 मे रोजी लग्न होणार होते. हा घातपात असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला असून पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Samruddhi Accident: समृद्धीवर भीषण अपघात! रिल्सच्या नादात बस उलटली; चिमुकलीचा मृत्यू, 25 जखमी
तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील केळवा रोड परिसरातील वाकसई गावात एक धक्कादायक आणि संशयस्पद घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा दुसऱ्याच दिवशी रेल्वे रुळांवर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आतेश प्रकाश भोईर असे मृत तरुणाचे नाव असून, तो ११ एप्रिल रोजी रात्री मायखोप येथे मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. चिंताग्रस्त कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला असता, दुसऱ्या दिवशी सकाळी केळवा रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर त्याचा मृतदेह आणि काही अंतरावर दुचाकी आढळून आली.
घटनास्थळी धाव घेत पालघर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा ठाम संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आतेश आनंदात होता. कारण त्याचा साखरपुडा १९ एप्रिलला आणि लग्न १० मे रोजी ठरलेले होते. “तो आत्महत्या करेल, यावर विश्वास बसत नाही. दुचाकी एका ठिकाणी आणि मृतदेह रेल्वे रुळांवर कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लग्नघरात शोककळा
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आतेशचा साखरपुडा होता, मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते त्या घरावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय. त्यामुळे नेमके काय घडले याचा उलगडा करण्यासाठी सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world