- मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News: जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एका आदिवासी तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. कुर्झे-कारेलपाडा येथील छाया बारकू रिंजड हिने MPSC 2025 परीक्षेत घवघवीत यश मिळवत एकाच वेळी दोन पदांवर आपली मोहर उमटवली आहे. छायाची 'असिस्टंट ऑफिसर' (Assistant Officer) आणि 'मंत्रालय क्लार्क' (Mantralaya Clerk) या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे.
अशिक्षित आई-वडील, पण मुलीच्या स्वप्नांना दिले बळ
छायाचे कुटुंब अत्यंत सामान्य असून तिचे आई-वडील अशिक्षित आदिवासी शेतकरी आहेत. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नसतानाही छायाने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले. शेतात घाम गाळून वडिलांनी छायाच्या शिक्षणासाठी आणि पुण्यात राहण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. "मला सुरुवातीला MPSC म्हणजे काय हे देखील माहिती नव्हते, पण काहीतरी मोठे करून दाखवायचे हे स्वप्न मनाशी बाळगले होते," अशा भावना छायाने व्यक्त केल्या.
(नक्की वाचा: जबरदस्त! अस्सा प्लान आखला... 80 लाखांचं कर्ज 12 महिन्यात फेडलं; तरुणीने सर्वांनाच केलं हैराण!)
पहिल्याच प्रयत्नात यश
आजच्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी हजारो रुपयांचे क्लासेस लावले जातात. पण कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय स्वतः अभ्यास करून मेहनतीच्या जोरावर छायाने पहिल्याच प्रयत्नात हे दुहेरी यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.
(नक्की वाचा: UPSC Success Story :तब्बल 35 वेळा अपयश, यश मिळाल्यानंतरही पुन्हा परीक्षा; IAS विजय यांचा थक्क करणारा प्रवास)
ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागतआपल्या मुलीने तालुक्याचे नाव मोठे केल्याचे समजताच विक्रमगडमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांचा गजर आणि गुलाल उधळत छायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी तिचे जंगी स्वागत करत सत्कार केला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांसाठी छायाची ही यशोगाथा आता एक मोठी प्रेरणा ठरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world