श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटां बरोबर सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक महाकाय बोया वाहत आली. त्यात कुणीही नव्हते. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही काळ घाबरट पसरली होती. याबाबत लागलीच मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी पोलीसांना माहिती दिली. श्रीवर्धन खालचा जीवना बंदर येथे एक बोया मिळून आला आहे. त्याला टायर लावण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अखेर श्रीवर्धन पोलीस व मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी याबाबतीत तपास करून अधिक माहिती घेतली.
मेरिटाईम बोर्डाचे निलेश तांबे यांनी दिलेल्या माहिती नुसार रायगड मधील बागमांडला ते रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाचे पिलरचे काम चालू आहे. यावेळी बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडाली होती. ती बुडालेले बार्ज समुद्रातूनवर खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस त्या बार्जला बोया बांधून ठेवण्यात आला होता. जेणे करून भरतीचे वेळेस समुद्रात पाणी भरल्यानंतर तो बार्ज फ्लोटिंग होऊन बाहेर काढता येईल. यासाठी त्यांनी या बोयाचा उपयोग केला होता. परंतु हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून हा बोया समुद्रात भरकटून गेला. त्यानंतर तो श्रीवर्धन समुद्रकिनारी लागला.
दरम्यान मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच श्रीवर्धन पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक फौजदार म्हात्रे, पोलीस हवालदार रुत, पोलीस शिपाई गोतावडे, पालवे, पोलीस शिपाय खिलात्री, पोलीस शिपाई गायकवाड, पो. शि. किटाळे व चंदनशिवे यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेऊन नागरिकांना या बोया पासून दूर ठेवण्यात आले. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक ही पाचरण करून तपास करण्यात आला. बुडालेल्या बार्जचे मालक, अब्दुल रजाक अन्सारी यांना ही संपर्क करण्यात आला होता.
त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितले की वीस आक्टोबर रोजी बाणकोट येथे पुलाच्या पिलरचे काम चालू होते. त्यावेळी बुडालेल्या बार्जला पाण्यातून वरती खेचण्या करिता त्यांनी बोया भाड्याने घेतला होता. परंतु , वातावरण खराब असल्यामुळे हा बोया तुटून समुद्रात भरकटला होता.समुद्रात फ्लॉटिंग बोयाचा उपयोग बोट सुरक्षित ठेवण्यासाठी बोटीच्या बाजूंना लावण्यात येतो. तसेच एखादी छोटी-मोठी वस्तू बुडाली असेल तर त्या समुद्रातून वरती खेचण्यासाठी बलून सारखा उपयोग केला जातो. तोच बोया श्रीवर्धन येथे आढळून आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world