अमजद खान, डोंबिवली
रिक्षा चालकाने बाईकस्वारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन रिक्षा चालकाने बाईकस्वाराच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात बाईक चालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. बाईक चालकाच्या तक्रारीवरुन रिक्षा चालकाच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा परिसरात राहणारे विशाल जाधव हे मार्केटिंगचे काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी ते डोंबिवली स्टेशनला गेले होते. स्टेशनच्या दिशेने बाईकवरुन जात असताना मागून येणाऱ्या एका रिक्षाने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यानंतर विशाल दुचाकीसह रस्त्यावर पडले.
(नक्की वाचा - 'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप)
विशाल यांनी गाडी उभी करुन याबाबत रिक्षा चालकाला याबाबत जाब विचारला. विशाल यांनी रिक्षा चालकाने म्हटलं की, दादा रिक्षा संभाळून चालव. जीव घेणार का? यावरुन रिक्षा चालकाने विशालसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या रिक्षा चालकाने त्याच्या गाडीतून लोखंडी रॉड काढला आणि त्या लोखंडी रॉडने विशाल यांच्यावर हल्ला केला.
(नक्की वाचा - मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर? पुण्यात मोठी कारवाई)
रिक्षा चालकाच्या हल्ल्यात विशाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला ७ ते ८ टाके पडले आहे. या घटनेनंतर रिक्षा चालक पसार झाला. रिक्षाचा नंबर विशालने विष्णूनगर पोलिसांना दिला आहे. या नंबरच्या सहाय्याने पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.
<
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world