मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून वाल्मिक कराडवर अनेक आरोप केले जात आहे. सध्या वाल्मिक कराड 15 दिवसांच्या बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान बीड पोलीस ठाण्याच्या बाहेर एका खांबाला लावलेले पाच पलंग चर्चेत आले आहे. हे पलंग वाल्मिक कराडसाठी आणल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस नेत्यांसह शरद पवार गटाच्या नेत्यांकडूनही हा सवाल उपस्थित केला जात आहे. वाल्मिक कराड बीड पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर या पाच पलंग का मागविण्यात आले, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असा सवाल शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे की, नवीन पलंग कर्मचाऱ्यांसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरू
विजय वडेट्टीवारांची पोस्ट...
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल! वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेली नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world