कास पठाराला लागलेले बदनामीचे ग्रहण अधिक गडद होत आहे. इथल्या एका हॉटेलमध्ये रविवारची रात्र चर्चेचा विषय ठरली आहे. दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करत बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार इथं घडल्याचं बोललं जात आहे. साताऱ्यातील कुविख्यात मच्छीबाज गुंडाचा हा धुडगुस सुरू होती. त्यात गाड्या फोडणे, डोकी फोडणे, हत्याराने वार करणे इथपर्यंत सर्व काही सुरू होतं. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार माहित असूनही याची नोंद पोलिसांकडे नाही. त्यामुळे या रेव्ह पार्टीला पोलिसांचा बंदोबस्त होता की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निसर्गसंपन्न यवतेश्वर घाट ते कास पठार हा जणू रेडलाईट एरिया झालाय की काय? अशी शंका येत आहे. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांसाठी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत दारूसह अंमली पदार्थांचा वापर सर्रास केल्याचे समजत आहे. गुंडासह 20 सहकारी आणि 10 बारबाला असा लवाजमा पहाटेपर्यंत या हॉटेसमध्ये धुडगूस घालत होता.
ट्रेंडिंग बातमी - मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी उत्तर देऊन टाकले, फडणवीसांचे मात्र मौन
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार परिसरात हा प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कानठळ्या बसवत होता. हा प्रकार या हॉटेलमध्ये पहिलाच नाही. असेही ग्रामस्थ आता सांगत आहेत. असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेलवाल्यांमुळे कास परिसर बदनाम होत असल्याचंही गावकरी सांगत आहेत. यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकाची ‘मल्हारवारी' काढलीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवार- अजित पवारांची दिल्लीत भेट! काय झाली चर्चा? दादा म्हणाले....
ही रेव्ह पार्टी सुरू असतानाच अचानक काही गंभीर गोष्टीही घडल्या आहेत. त्यातून कोयते, तलवारी नाचवण्यात आल्या. यामध्ये काही गाड्या ही फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी ही फुटल्याचे आता समोर आला आहे. काहींच्यावर कोयत्याने वार झाले असंही सांगण्यात येत आहे. अंमली पदार्थ आणि दारू पिवून ही भांडणं झाली. बाटल्या डोक्यात फोडण्यात आल्या. बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत. विशेष म्हणजे या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच नुकसानीची भरपाई दिल्याचे समजत आहे.
याच भागात काही दिवसांपूर्वी एका खासगी बंगल्यात एक रिल स्टारसह काहींना वेश्या व्यवसाय करताना पकडण्यात आले होते. यवतेश्वर घाट हा नशेली अड्डा झाला आहे की काय अशी स्थिती आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या गुंडांवर आणि त्यांना रेवपार्टी करू देणाऱ्या हॉटेल मालकावर कोणती कारवाई केली जाते याकडे आता साताऱ्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. की केवळ चौकशीचे नाटक करून पुन्हा जैसे थे स्थिती होणार याकडेही सर्वांची नजर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world