भाजपच्या युवा नेत्याच्या पत्नीचा गुढ मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिचा मृत्यू झाल्यानंतर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा ही तिच्या सासरच्या लोकांचा डाव होता. ही घटना राजस्थानमधील भरतपूर येथे घडली आहे. भाजप युवा मोर्चाच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर मृत महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर थेट हत्येचा आरोप केला आहे. हा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून भाजप नेत्याच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरचे लोक तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. 2018 पासून हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता ही बाब समोर आली आहे. छळलुहासा गावचे रहिवासी ओमप्रकाश यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह 2018 मध्ये बयाना येथील पिदावली गावचा रहिवासी आकाश याच्याशी झाला होता. तो भाजप युवा मोर्चाचा माजी महामंत्री आहे. लग्नानंतर आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांकडून प्रियंकाला सातत्याने हुंड्यासाठी त्रास दिला जात होता.
प्रियंकाने अनेकदा याबाबत तक्रार केली होती, मात्र त्यांची मागणी वाढतच गेली. शनिवारी पिदावली गावातील नातेवाईकांनी ओमप्रकाश यांना प्रियंकाच्या मृत्यूची आणि सासरचे लोक अंत्यसंस्कार करत असल्याची माहिती दिली. ओमप्रकाश यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. प्रियंकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे निशाण आणि गळ्यावर निळे डाग आढळले आहेत. यामुळे हत्येचा संशय बळावला आहे. ही हत्या असल्याचं प्रियंकाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.
सेवर पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल (FSL) पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तसेच सर्व बाजूने तपास सुरू आहे. आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रियंकाच्या पश्चात युवराज वय 7 आणि काव्य 5 अशी दोन लहान मुले आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचं बोललं जात आहे. वेळीच प्रियंकाने केलेल्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर तिचा जीव गेला नसता असं तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world