सत्र न्यायालयाने चर्चित कीर्ती व्यास मर्डर प्रकरणात सोमवारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी घोषित केलं आहे. सहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनात आतापर्यंत तपास टीमला कीर्तीचा मृतदेह किंवा मृतदेहाचा काही भाग सापडू शकलेला नाही.
मात्र गुन्हे शाखेकडे पुरेसे डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते की, कोर्टाने याच्या आधारावर दोन्ही आरोपींना हत्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. 16 मार्च, 2018 रोजी कीर्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात 2018 मध्ये आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. खुशी सजलानी हिला 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. मात्र सिद्धेश ताम्हणकर तुरुंगात होता. हे प्रकरण शीना बोरा सारखं हायप्रोफाइल होतं. त्यामुळे तत्कालिन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर, गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना आणि अतिरिक्त सीपी के.एम. प्रसन्ना सातत्याने लक्ष ठेवून होते.
रक्त वाळले होते...
आरोपी खुशी सजलानी हिची फोर्ड इकोस्पोर्ट कार मुंबई क्राइम ब्रान्चने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली होती , त्यानंतर या हत्याकांडाचा पहिला पुरावा सापडला. कारमध्ये सीटच्या पुढे आणि मागे सुकलेल्या रक्ताच्या खुणा सापडल्या होत्या. हे रक्त कीर्तीच्या आई-वडिलांच्या रक्ताशी जुळवून पाहण्यात आलं, तेव्हा डीएनए मॅच झालं होतं. त्यामुळे त्या कारमध्ये कीर्तीदेखील असल्याचं सिद्ध झालं होतं. यानंतर डीसीपी दिलीप सावंत आणि त्यांच्या टीमने खुशी सजलानी यांची कडक चौकशी केली. यानंतर सिद्धेश ताम्हणकर याचाही तपास सुरू केला. काही काळानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला.
कीर्तीच्या कंपनीत बॉलिवूड अभिनेताही होता पार्टनर
कीर्ती व्यास ही अंधेरीतील बी ब्लंट कंपनीत मोठ्या पदावर होती. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता तिच्या कंपनीत पार्टनर होता. खुशी आणि सिद्धेशदेखील याच कंपनीत काम करीत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याचा परिणाम सिद्धेशच्या परफॉर्मन्समध्ये दिसत होता. त्याकाळात जीएसटी सुरू झालं होतं. सिद्धेशला याबाबत माहिती नव्हती, मात्र तो ते शिकून घेण्याचाही प्रयत्न करीत नव्हता. यानंतर कीर्तीने सिद्धेशला नोटीस पाठवली होती. 16 मार्चला ज्या दिवशी कीर्तीची हत्या झाली तो सिद्धेशच्या नोटीसला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता. सिद्धेशची नोकरी सुरू होऊन पाच वर्षेही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे नोकरी गमावण्याशिवाय त्याला ग्रॅच्युटी मिळणार नसल्याची भीती होती.
नक्की वाचा - रक्ताचा नमुना कचऱ्यात, ससूनच्या डॉक्टरांचं बिंग असं फुटलं; आयुक्तांकडून धक्कादायक माहिती
16 मार्च रोजी खुशी आणि सिद्धेश दोघेही कारने कीर्तीच्या घरी गेले. काही कारणं सांगून दोघांनी तिला आपल्या कारमध्ये बसवलं. कार ऑफिसच्या दिशेने निघाली. यावेळी सिद्धेशने कीर्तीला नोटीस मागे घेण्यासाठी दबाव टाकला. मात्र कीर्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी सिद्धेश याने कीर्तीचा गळा दाबला आणि मृतदेह कारच्या मागे टाकला. यानंतर खुशी मृतदेह असलेली कार घेऊन सांताक्रुझला आपल्या घरी गेली. तेथे कार पार्क करून अंधेरीला ऑफिसमध्ये पोहोचली. सायंकाळी पाच वाजता दोघे आरोपी ऑफिसमधून निघाले. खुशीने आपल्या घरासमोरील कार काढली. रस्त्यात सिद्धेशला घेतलं आणि कीर्तीचा मृतदेह चेंबुरजवळील मेहुल गावात एका नाल्यात फेकून दिला.
मुंबई सेंट्रलच्या सीसीटीव्हीमध्ये दिसली नाही तेव्हा...
16 मार्च रोजी कीर्ती घरी पोहोचली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी ब्लंट कंपनीचे सर्व कर्मचारीही आले होते. त्यावेळी खुशी आणि सिद्धेशदेखील होते. जेव्हा गुन्हे शाखेने कीर्तीच्या घरापासून तिच्या ऑफिसपर्यंतचे सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले. आपलं बिंग फुटेल या भीतीने त्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्या दिवशी सकाळी कीर्ती आमच्यासोबत कारमध्ये होती. मात्र आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सोडलं, कारण ती ट्रेनने ऑफिसला जात होती. आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं. मात्र स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती दिसली नाही, तेव्हा गुन्हे शाखेने खुशीची कार फॉरेन्सिक लॅबला पाठवली आणि त्यात मिळालेल्या रक्ताच्या डागांमुळे हत्याकांडाचा खुलासा झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world