जाहिरात

Shirpur News : ATM बाहेर गाडी, नागरिकाचा सतर्कपणा; मध्यरात्री चोर-पोलिसांमध्ये असा रंगला खेळ, मोठा कट उधळला!

एका सतर्क नागरिकाने '११२' या आपत्कालीन क्रमांकावर दिलेल्या माहितीमुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Shirpur News : ATM बाहेर गाडी, नागरिकाचा सतर्कपणा; मध्यरात्री चोर-पोलिसांमध्ये असा रंगला खेळ, मोठा कट उधळला!

Shirpur News : शिरपूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मशीन उखडून नेण्याचा चोरट्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. एका सतर्क नागरिकाने '११२' या आपत्कालीन क्रमांकावर दिलेल्या माहितीमुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून चोरी करण्याचे तंत्र शिकले होते.

​धुळ्यातील शिरपूरमध्ये 'त्या' मध्यरात्री नेमकं काय घडलं? 

​शनिवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास शिरपूर येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएमसमोर एक पिकअप वाहन आणि तीन संशयास्पद तरुण उभे असल्याची माहिती एका नागरिकाने ११२ क्रमांकावर दिली. या वाहनाला लोखंडाची साखळी बांधलेली असल्याने चोरीचा संशय बळावला होता. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

​फिल्मी स्टाईल पाठलाग

​पोलीस येत असल्याचे पाहताच चोरट्यांनी पिकअप घेऊन भोरखेडा (चोपडा रोड) च्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवल्याने घाबरलेल्या चोरट्यांनी काही अंतरावर आपले वाहन सोडून दिले आणि अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला. पोलिसांनी सोडून दिलेल्या वाहनाची झडती घेतली असता त्यात एक मोबाइल फोन आणि फास्टॅग (Fastag) आढळून आला. हे दोन धागेदोरे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

Navi Mumbai : 'हॅलो, मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय'; एक कॉल अन् नवी मुंबईतील वृद्ध मोठ्या ट्रॅपमध्ये अडकला

नक्की वाचा - Navi Mumbai : 'हॅलो, मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय'; एक कॉल अन् नवी मुंबईतील वृद्ध मोठ्या ट्रॅपमध्ये अडकला

दोन आरोपींना बेड्या, गुन्ह्याची कबुली

​मोबाइल क्रमांक आणि वाहनाच्या माहितीवरून पोलिसांनी तपासचक्र फिरवून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. हेमंत सुकलाल माळी (वय २१, रा. भिलडाई, धुळे)
२. विधूर देवा जाधव उर्फ विजू (वय ३८, रा. वसंत नगर, पारोळा, जि. जळगाव)

​चौकशीदरम्यान आरोपींनी शिरपूरमधील चोरीच्या प्रयत्नासह अमळनेर आणि धुळे शहरात यापूर्वी केलेल्या एटीएम चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. 

​युट्यूब ठरली 'चोरीची शाळा'

​तपासातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, एटीएम मशीन साखळीने ओढून कशी उखडायची याचे प्रशिक्षण आरोपींनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून घेतले होते. या तंत्राचा वापर करून ते मशीनच पळवण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. नागरिकाच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडणं शक्य झालं. पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे. नागरिकांनी अशाच प्रकारे संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून गुन्हेगारीला आळा घालता येईल. ​सध्या शिरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या टोळीने राज्यातील इतर भागातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com