मेहबूब जमादार, प्रतिनिधी
वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महाडमध्ये अटक करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा गायब होत्या. त्यांना अखेर गुरुवारी सकाळी महाडमध्ये अटक करण्यात आलीय. मनोरमा खेडकर यांच्या अटकेचं CCTV फुटेज NDTV मराठी च्या हाती लागलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मनोरमा महाडच्या हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होत्या. बुधवारी (17 जुलै) रात्री साडे नऊच्या सुमारास मनोरमा यांनी या हॉटेलमध्ये रुम घेतली. त्यांनी रजिस्टरमध्ये नाव इंदूबाई ज्ञानदेव ढाकणे हे नाव लिहिलं होतं. तपास यंत्रणांना पत्ता लागू नये असा त्यांचा हेतू होता. मनोरमा यांच्यासोबत आणखी एक जण होता. त्यांनी नाव नोंदवताना आई आणि मुलगा असं नातं सांगितलं होतं. दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि आईचं नाव इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे अशी नावं रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली.
मनोरमा या हॉटेलमध्ये लपून बसल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रात्री दोनच्या सुमारास दोन विशेष टीम या हॉटेलमध्ये दाखल झाल्या. चौकशीनंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनोरमा यापूर्वीही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होत्या. त्यांच्या तपासासाठी तीन विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या.
( नक्की वाचा : पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव )
का केली अटक ?
पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65) या शेतकऱ्याने मनोरमा खेडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 4 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता पुण्यातील धडवली येथील जागा प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुल दाखवित धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी त्यांच्यासोबत काही बाउन्सरदेखील होते. मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, दमदाटी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world