
संजय रमाकांत तिवारी, नागपूर
रात्री प्रवास करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस नागरिकांसाठी धोक्याच्या ठरत असल्याचं चित्र आहे. कधी चालकाला डुलकी लागते तर कधी भरधाव बस कुठेही जाऊन शिरते. कधी चालत्या बसमधील टायरचा स्फोट होतो तर कधी शॉर्ट सर्किटमुळे अचानक बस पेट घेते आणि बर्निंग बसचा थरार अनुभवायला मिळतो. त्या बसची मालकी असलेली खाजगी ट्रॅव्हल्स कंपनी कित्येकदा अपघातानंतर प्रवाशांची साधी दखलही घेत नाहीत. नागपूरच्या एका प्रवाशाचा अनुभव धक्कादायक असाच आहे. पाहूया खाजगी ट्रॅव्हल्स बसेसचा हा एक रिॲलिटी चेक.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या वर्षी 22 एप्रिल रोजी रात्री गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर धडधडून पेटणाऱ्या खासगी बसमधून कसेबसे प्रवाशांचे जीव वाचले. पण, कित्येक प्रवाशांचे सामान आणि मोबाइल फोन यात बेचिराख झाले. याबाबत रायपूर ते हैद्राबाद बसमधून प्रवास करणाऱ्या अवधेश दीक्षित याने सांगितलं, मी रायपूर येथून हैदराबादकडे निघालो होतो. आमची बस महाराष्ट्राच्या गोंदिया येथे थांबली होती. ड्रायव्हर काही प्रवाशांना उतरवत असताना बसचा एक टायर फुटला आणि बसमध्ये आग लागली. सगळ्या प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं. ड्रायव्हरने हातात अग्निशमन सिलेंडर घेऊन आग विझवायचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण बस जळून खाक झाली. कित्येक प्रवाशांचे मोबाईल फोनसह सामान जळाले.
5 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यात कर्नाटकला जाणारी बस सुद्धा धावता धावता पेटली. सर्व 15 प्रवासी सुखरूप बचावले पण कित्येकांचे सामान बससोबत जळून गेलं. यापूर्वी, यवतमाळ जिल्ह्यातच 24 मार्च रोजी एका पुलाच्या भिंतीला ही बस धडकली होती. जीव वाचला पण एकूण 35 प्रवासी जबर जखमी झाले. त्यापैकी एक नागपूरचे 54 वर्षीय राजेंद्र उट्टलवार दोन्ही पायांनी जबर जखमी झाले आहेत.
नक्की वाचा - Mumbai-Goa Bus Accident : मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, 35 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस पलटली
घटना घडली त्याचा अनुभव सांगताना ते म्हणतात, सैनी ट्रॅव्हल्सची बस आम्हाला घेऊन कोल्हापूरहून निघाली होती. ड्रायव्हरची झोप नीट झाली होती की नाही ते माहीत नाही. रात्री यवतमाळ जिल्ह्यात असताना अचानक जोराचा आवाज झाला..सगळीकडे धूर धूर झाला.. एकच आरडाओरड सुरू झाली होती.. माझ्या मुलाच्या पायाला दुखापत झाली होती.. आम्ही जीवाच्या आकांताने कसे बसे खाली उतरलो. समोरून त्याच सैनी कंपनीच्या दोन बस गेल्या. प्रवाशांनी हात दाखवले पण त्या आमच्यासाठी थांबल्या नाहीत.
या घटनेतून आलेला अनुभव खाजगी ट्रॅव्हल्सचा कारभार कसा आहे याची पुरेशी झलक दाखवतो. या घटनेत दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालेले प्रवासी राजेंद्र उट्टलवार खाजगी बसच्या एकेक चुका मोजताना सांगतात की, बसमध्ये दोन चालक होते. मात्र त्या दोघांचीही झोप झालेली नसावी. त्यांनी मागील टूर किती तासापूर्वी केला, त्यांना किती तास झोप मिळाली याची माहिती नाही. पण त्यांची झोप झालेली नसावी असेच दिसत होते.. मुख्य रस्त्याच्या बऱ्यापैकी बाजूला असलेल्या पुलाला बस आदळली आणि पुलाची भिंत बसला मधून चिरत आत आली. थोड्या फरकाने वाचलो अन्यथा बस पस्तीस चाळीस फूट खाली पडली असती.अशा वेळी बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नाही.
नक्की वाचा - Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?
बसमध्ये अग्निशमन यंत्र नव्हते. खिडकीची काच फोडून बाहेर यायचा पर्याय नव्हता कारण काच फोडायला अनिवार्य हॅमर देखील तिथे उपलब्ध नव्हते. या घटनेत 35 जण जखमी झाले, मात्र ट्रॅव्हल्स बस कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. माझ्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर आहे. मुलाच्या पायाचे ऑपरेशन करायचे आहे. तो इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षाला होता. या घटनेमुळे त्याची परीक्षा गेली. आतापर्यंत एक लक्ष पेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहे.मुलाच्या पायाचे दोन ऑपरेशन करायचे असून अजून साडे तीन लाख रुपये लागणार आहेत. शासन, प्रशासन किंवा खाजगी बस कंपनी कुणीही दखल घेतली नाही..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world