
UPSC Student : UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने मुलगी बनण्याच्या तीव्र इच्छेतून सर्जिकल ब्लेडने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला. या घटनेमुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला मुलगा म्हणून जगायचे नव्हते, तर मुलगी व्हायचे होते. त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. प्रायव्हेट पार्ट कापण्याआधी त्याने स्वतःला बधिर करण्यासाठी ॲनेस्थेशियाचे इंजेक्शनही घेतले होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.
झोलाछाप डॉक्टरच्या सल्ला आणि....
या विद्यार्थ्याने एका झोलाछाप डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे कृत्य केले. इंजेक्शनचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि तो खोलीतच वेदनेने तळमळू लागला. त्याच्या खोलीतील मालकाने त्याला पाहिले आणि तातडीने बेली सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला स्वरूपराणी नेहरू (SRN) रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : 1 लाख देतो, आजारही बरा करतो; धर्मांतरासाठी दिलं आमिष, अकोल्यातील धक्कादायक प्रकार )
'मी मुलगा नाही, मुलगी आहे'
UPSC ची तयारी करत असलेल्या या विद्यार्थ्याने धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला की, त्याला नेहमीच असे वाटत होते की तो मुलगा नाही, तर मुलगी आहे. तो 14 वर्षांचा असल्यापासून त्याला हे जाणवत होते. मात्र, कुटुंबातील कोणीही त्याचे म्हणणे ऐकत नव्हते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने तो त्यांना काहीच सांगू शकला नाही. शेवटी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
हा विद्यार्थी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्याचा रहिवासी असून प्रयागराज येथे UPSC परीक्षेची तयारी करत होता. मुलगी होण्यासाठी तो YouTube वर माहिती शोधत होता. याच शोधादरम्यान तो कटरा येथील एका झोलाछाप डॉक्टरच्या संपर्कात आला. त्याच डॉक्टरच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले, तसेच डॉक्टरने त्याला आवश्यक साहित्यही दिले होते.
( नक्की वाचा : Video : रस्त्यावर घरंगळत गेले शीर, आरोपीने उचलून फेकले कचरापेटीत; भारतीय मॅनेजरच्या हत्येने अमेरिका हादरली )
SRN रुग्णालयाच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थ्याला जेव्हा रुग्णालयात आणले, तेव्हा तो पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात होता. डॉक्टरांच्या मते, हा विद्यार्थी ‘जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर' किंवा ‘जेंडर डिस्फोरिया'ने ग्रस्त आहे.
वेळेवर रुग्णालयात पोहोचल्याने त्याचा जीव वाचला. आता मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने त्याचे समुपदेशन (काउंसलिंग) केले जाईल. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. संतोष सिंह यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world