बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारं विशेष पथक आता वाल्मिक कराडच्या (Walmik Karad Property) साम्राज्याला सुरुंग लावणार आहे. त्यासाठी एसआयटीने कराडच्या संपत्तीवर जप्तीची मागणी करणारा अर्ज कोर्टात दाखल केला आहे. वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती, कुठे आणि कुणाच्या नावे आहे. याचा सविस्तर घेतलेला आढावा...
गेल्या काही दिवसांत वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. बीडसह, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कराडची कोट्यवधींची संपत्ती आढळली. या संपत्तीचे आकडे डोकं चक्रावणारे होते. वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं आहे. मात्र याच साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी एसआयटी पथक तयारीला लागलं आहे. एसआयटीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला आहे.
नक्की वाचा - Walmik Karad: वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?
वाल्मिक कराडची संपत्ती किती?
- पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीत पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे 4 बीएचके फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी आहे.
- वाकडमध्ये 2 बीएचके फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी आहे.
- वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफीस स्पेस आहेत. अंदाजे बारा कोटी रुपये इतकी याची किंमत आहे.
- दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्याच नावे पुण्यातील हडपसरमधील एमनोरा टाऊनशीपमधे दोन फ्लॅट आहेत. ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये आहे.
- याशिवाय बीड जिल्ह्यातल्या सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडे यांच्या नावावर 50 एकर जमीन आहे.
- बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात ज्याती जाधव यांच्या नावावर 50 एकर जमीन आहे.
- सिमरी पारगाव गावात मनिष नरोडे यांच्या नावावर 10 ते 12 एकर जमीन आहे.
- सिमरी पारगावमध्येच योगेश काकडे यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट
आता वाल्मिक कराडच्या या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे. मात्र ही संपत्ती वाल्मिकच्या नावे असली तरीही त्यात आकाच्या आकाचाही हिस्सा असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. तर वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे सर्व काळे धंदे माहिती असल्यामुळे धनंजय मुंडे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होत असली तरीही विरोधकांना कारवाईबाबत शंका आहे. यापूर्वीही अनेकांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई झाली. पण तीच माणसं सत्तेत आल्यानंतर पुढे काय झालं? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
वाल्मिक कराडवर सध्या बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील चार ते पाच दिवस हे उपचार चालतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र वाल्मिकवर सुरू असलेल्या उपचारांवर अंजली दमानियांनी जोरदार टीका केली आहे. वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आवळला जातोय. कराडच्या संपत्तीवर यंत्रणांची टाच आली तर त्याच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. दरम्यान या कारवाईदरम्यान वाल्मिक कराडच्या पापाचे वाटेकरी समोर येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world