Woman Molestation News: भररस्त्यात महिलेचा कथित स्वरुपात विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी एका कॉन्स्टेबलविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओच्या आधारेच कॉन्स्टेबलविरोधात कारवाई करण्यात आलीय. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला आणि निलंबित कॉन्स्टेबलमधील वाद कैद झाला होता तसेच या महिला पोलिसांच्या गाडीकडे कॉन्स्टेबलला ओढून नेतानाही दिसत आहेत.
भररस्त्यात छेड काढल्याचा कॉन्स्टेबलवर आरोप
पीडित महिलेने तक्रार नोंदवताना आरोप केलाय की, नजीराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस रिस्पॉन्स व्हेहिकल सेवेमध्ये (पीआरव्ही) (Police Response Vehicle) तैनात असणाऱ्या कॉन्स्टेबल बृजेश सिंहने भररस्त्यात तिची छेड काढली. "मी एकटी होते, म्हणून सुरुवातीस शांत राहिले, पण त्याचे गैरवर्तन सुरूच होते"; अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.
आई-ताईला घेऊन महिला पुन्हा घटनास्थळी दाखल
पुढे पीडितेने सांगितले की, "घरी पोहोचल्यानंतर घडला प्रकार मी आई आणि ताईला सांगितला, यानंतर त्यांच्यासोबत मी घटनास्थळी पुन्हा पोहोचले. त्यावेळेसही कॉन्स्टेबल बृजेश सिंह तेथेच तैनात होता". जेव्हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने कथित स्वरुपात तिचा फोन खेचण्याचा प्रयत्न केला आणि हातही मुरगळला, यामुळे बांगड्या फुटल्या, असाही आरोपी पीडितेने केलाय. यानंतर तिने बहिणीच्या मदतीने पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील काकादेव भागामध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: हॉटेल रुम, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती, बदनेनं लपवलाय महत्त्वाचा पुरावा?)
कॉन्स्टेबलविरोधात तत्काळ निलंबनाची कारवाई
सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वरूप नगर) सुमित सुधाकर रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विनयभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलीय. प्राथमिक तपासात आरोप खरे असल्याचे आढळून आलंय. त्यामुळे कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहितीही सहाय्यक पोलीस आयुक्त रामटेके यांनी दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.
(Content Source: PTI/PTI Bhasha)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
